scorecardresearch

“…त्यांना शरम वाटली पाहिजे”, शरद पवारांचा राज्यपाल कोश्यारींवर हल्लाबोल!

महामोर्चादरम्यान केलेल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल केला आहे.

“…त्यांना शरम वाटली पाहिजे”, शरद पवारांचा राज्यपाल कोश्यारींवर हल्लाबोल!
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत. त्यांच्या विधानांमुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीने मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केलं होतं. या मोर्चादरम्यान केलेल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल केला आहे.

केंद्र सरकारने राज्यपालांची लवकरात लवकर हकालपट्टी केली नाही, तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पवारांनी दिला. आपल्या भाषणात शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्राच्या सन्मानासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येनं लोक येथे आले आहेत. आज ज्यांच्या हातात राज्याची सूत्रं आहेत, ती लोक महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वेगळ्या प्रकारची भाषा वापरत आहेत.”

“स्वातंत्र्य भारताला आत्मविश्वास देण्याचं ऐतिहासिक काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. या देशात अनेक राजे होऊन गेले. अनेकांची संस्थाने झाली, पण मागील साडेतिनशे वर्षांपासून सामान्य माणसांच्या अंतकरणावर एकच नाव अखंड आहे, ते नाव म्हणजे हिंदवी स्वाराज्याची स्थापना करणारे ‘शिवछत्रपती’. अशा शिवाजी महाराजांचा आक्षेपार्ह उल्लेख राज्याचा एखादा मंत्री करतो, अन्य कुणी सत्ताधारी पक्षाचे घटकपक्ष करतात. हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. ही भावना तीव्र करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं तुम्ही इथे आला आहात. यातून राजकर्त्यांनी बोध घेतला नाही, तर लोकशाहीच्या मार्गाने त्यांना धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही. याबद्दलची खात्री मला स्वत:ला आहे,” असा इशारा शरद पवारांनी दिला.

हेही वाचा- “…तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही”, शरद पवारांचा मोदी सरकारला थेट इशारा

पवार पुढे म्हणाले, “महाराष्ट्राची काही वैशिष्ट्ये, काही सन्मानचिन्हे आहेत. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्वजण आपल्या सन्मानाची आणि आदराची स्थानं आहेत. पण आजचे राजकर्ते या महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलतात. महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल मी कधीही पाहिला नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन मला ५५ वर्षे झाली, या काळात मी अनेक राज्यपाल पाहिले. या लोकांनी महाराष्ट्राचं नावलौकिक वाढवण्याचं काम केलं. पण यावेळी अशी एक व्यक्ती याठिकाणी आली आहे. जी महाराष्ट्राच्या एकंदरीत विचारधारेला संकटात नेण्याचं काम करत आहे. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपालांनी बाष्कळ उद्गार काढले आहेत. त्यांना शरम वाटली पाहिजे.”

हेही वाचा- फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप? शिंदे-फडणवीस सरकारबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

“महात्मा फुलेंनी सर्वसामान्य माणसाला संघटित करण्यासाठी, आधुनिक विचार देण्यासाठी, परिवर्तन घडवण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि ज्ञानदानाचं काम केलं. अशा सामाजिक कामासाठी पुढाकार घेणारा एक थोर नेता म्हणून महात्मा फुलेंना संपूर्ण देशात ओळखलं जातं. मी जेव्हा बिहार, उत्तरप्रदेश किंवा इतर काही ठिकाणी जातो, तिथेही महात्मा फुलेंचं नाव आदराने घेतलं जातं. अशा नेत्याबद्दल राज्यपालांकडून टिंगलटवाळी केली जात असेल तर त्यांना राज्यपाल पदावर बसण्याचा अधिकार नाही,” असंही शरद पवार म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 16:31 IST

संबंधित बातम्या