राष्ट्रवादीचा फडणवीस यांच्यावर थेट आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील विविध घोटाळे समोर येत आहेत. प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने सारे कार्यकारी अधिकार हे फक्त मुख्यमंत्र्यांनाच आहेत. यामुळेच झोपु योजनेतील घोटाळ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी करण्यात आला.

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे विश्वास पाटील यांनी निवृत्तीपूर्वी मोठय़ा प्रमाणावर फायलींवर स्वाक्षऱ्या केल्या. पण यामागे कोण आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे. ताडदेवमधील अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांकाचा घोटाळा समोर आला आहे. त्यात गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. घाटकोपरमधील एका योजनेसाठी लाचेची रक्कमच पत्रकार परिषदेत सादर करण्यात आली.

या संबंधी मेहता आणि भाजपच्या एका आमदाराचेच नाव घेण्यात आले. यावरून मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या झोपटपट्टी पुनर्विकास योजनेत सारे काही आलबेल नाही हेच स्पष्ट होते, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

महाराष्ट्रातही अल्पसंख्याकांवर हल्ले

तथाकथित गोरक्षकांनी गुजरात, हरयाणा, झारखंड या राज्यांमध्ये अल्पसंख्याकांवर हल्ले केले आहेत. आता हे लोण महाराष्ट्रात व तेही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूरमध्ये आले आहेत. नागपूरजवळील काटोल येथे एका अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकाला गोमांस बाळगत असल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आली. वास्तविक कत्तलखान्यातून मांस तो नागरिक विक्रीसाठी घेऊन जात होता. राज्य सरकारने हल्लेखोरांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी मलिक यांनी केली.

कारागृह अधिकाऱ्यांना निलंबित करा

भायखळा महिला कारागृहात तर कारागृह कर्मचाऱ्यांनीच केलेल्या मारहाणीत मंजुळा शेटय़े या कैद्याचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये तुरुंग अधिकारी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करतो, असा आरोप एका महिला अधिकाऱ्याने पत्राद्वारे केला आहे. या साऱ्या घटनांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही राष्ट्रवादीने केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp comment on slum rehabilitation scam and devendra fadnavis
First published on: 14-07-2017 at 02:02 IST