राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता राष्ट्रवादीने अपेक्षेप्रमाणे माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांची उमेदवारी सोमवारी जाहीर केली. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावरही पटेल यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तारिक अन्वर यांची बिहारमधून लोकसभेवर निवड झाल्याने त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. अन्वर यांची राज्य विधानसभेतून जुलै २०१० मध्ये राज्यसभेवर निवड झाली होती. अन्वर यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या एका जागेसाठी १९ जूनला पोटनिवडणूक होत आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी संसदीय मंडळाची बैठक झाली. त्यात पटेल यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावरही पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. या वेळी त्यांचा पराभव झाल्यावर पटेल यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. पटेल हे पक्षात शरद पवार यांचे उजवे हात समजले जातात. शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचे मंत्री आणि आमदारांची बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोणती व्यूहरचना करता येईल यावर विचारविनिमय करण्यात आला. पक्षाच्या आमदारांनी मतदारसंघांतील कामे लवकर मार्गी लागावीत, अशी मागणी केली.