हक्कभंग प्रस्ताव मांडणाऱ्या शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल ३१ जुलैच्या आत लावण्याच्या या आश्वासनाचे पालन करण्यास अपयशी ठरलेले उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडणारे शिवसेनेचे अनिल परब यांची कोंडी करीत राष्ट्रवादी काँग्रेसची फौज तावडे यांच्या मदतीला धावली. काँग्रेस नेते नारायण राणे यांनीही परब यांना हक्कभंग प्रस्ताव मांडण्यास विरोध केला. मात्र उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी, शिक्षणमंत्री तावडे यांच्याकडून खुलासा घेऊन हा प्रस्ताव विधान परिषदेच्या विशेष अधिकार समितीकडे पाठविण्यात येईल, असे जाहीर केले.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे ३१ जुलैच्या आत निकाल लावावेत असे राज्यपालांनी कुलगुरूंना सुनावले होते. सभागृहात त्यावर चर्चा झाली त्या वेळी कोणत्याही परिस्थिती राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत निकाल लावले जातील, असे आश्वासन तावडे यांनी दिले होते. त्यावर ३१ जुलैपर्यंत परीक्षांचे निकाल लागले नाहीत, तर शिक्षणमंत्री तावडे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्याचा इशारा  शिवसेनेचे अनिल परब यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी मंगळवारी विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडत असतानाच, सत्ताधारी पक्षाचा सदस्य सरकारवर हक्कभंग मांडू शकतात का, असा नारायण राणे यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून, परब यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

राणे यांच्या हरकतीच्या मुद्दय़ावर उपसभापती ठाकरे यांनी सत्ताधारी सदस्य असा हक्कभंग प्रस्ताव मांडू शकतो, असा निर्णय दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडण्यासाठी सात सदस्यांनी उभे राहून त्याला समर्थन देणे आवश्यक आहे, असे सांगितले. त्यासाठी त्यांनी विधान परिषद कामकाज नियमावलीकडे बोट दाखविले. परब यांना पाठिंबा देणारे सात सदस्य कोण आहेत, अशी विचारणा करून तटकरे यांनी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. प्रस्ताव नियमानुसार नसून परब यांनी जे मांडले ते सर्व कामकाजातून काढून टाकावे अशी मागणी त्यांनी केली.

माणिकराव ठाकरे यांनी मात्र नियमानुसारच आपण परब यांना हक्कभंग प्रस्ताव मांडायला मान्यता दिल्याचे सांगून तटकरे यांची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले. मात्र माणिकराव ठाकरे यांनी नियमावर बोट ठेवून परब यांनी मांडेलल्या प्रस्तावावर मंत्री तावडे यांचे स्पष्टीकरण घेऊन हे प्रकरण विशेष अधिकारी समितीकडे पाठविण्यात येईल, असे जाहीर केले. शिवसेनेच्या वतीने मांडण्यात आलेल्या हक्कभंग प्रस्तावाच्या निमिताने नारायण राणे, तटकरे या नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सारे सदस्य विनोद तावडे यांच्या मदतीला धावल्याचे चित्र होते.