महाविकास आघाडीला त्रास देण्याचा राष्ट्रवादीचा कधीच प्रयत्न राहिला नाही किंवा एकला चलो ही भूमिका राहिलेली नाही. तिन्ही पक्ष एकत्र राहावेत हीच भूमिका आहे. प्रफुल्ल पटेल हे परदेशी असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. कोणत्या परिस्थितीत निर्णय झाला हे पाहिल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

“नाना पटोले यांचा आरोप चुकीचा आहे. राज्यात येणार्‍या काळात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक नेतृत्वाने सर्वांना एकत्र बसवून महाविकास आघाडी एकत्र रहावी असे प्रयत्न करणे अपेक्षित होते. गोंदियामध्ये नाना पटोले म्हणतात त्याप्रमाणे वेगळं काम झालं असेल तर त्याची नोंद पक्ष घेईल,” असेही जयंत पाटील म्हणाले.

“स्थानिक नेत्यांचे कुणाशी पटते तर कुणाशी पटत नाही किंवा टोकाची मतमतांतरे कुणाची झाली आहेत याचादेखील दुसर्‍या बाजूने विचार करून घेण्याची आवश्यकता आहे. यासंबंधी माहिती घेऊ. नाना पटोले यांनी संपर्क साधला होता. मात्र स्थानिकदृष्टया मनं दुभंगलेली असल्यामुळे अडचणी निर्माण होत असाव्यात. याबाबतीत तपशीलात जाऊ,” असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

“राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसला”, नाना पटोलेंचा हल्लाबोल; म्हणाले, “जाब नक्की विचारू”!

“राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकलं पाहिजे असा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने निर्णय वेगळा दिला. जर आणखीन पुढे दोन – तीन महिने थांबण्याची तयारी ठेवली असती तर इम्पिरिकल डेटा आला असता आणि सर्व आरक्षण मिळाली असती व सर्वांना न्याय मिळाला असता. मात्र सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे त्यावर काही विधान करायचं नाही. पण मध्य प्रदेशमध्ये सुध्दा भाजपाला ओबीसी आरक्षण टिकवता आले नाही,” अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

“महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या आरक्षणविरोधी भूमिका घेतली हे विरोधकांचे आरोप खोडसाळ आहेत. मुळात भाजपाची सत्ता असताना ओबीसींना ते आरक्षण देऊ शकले नाहीत,” असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

“आता सुप्रीम कोर्टाने निवडणूका घेण्याचा निर्णय दिला आहे त्यानुसार त्याची तयारी सुरू आहे. इम्पिरिकल डेटा गोळा करणारी समितीने दोन – तीन महिन्यात डेटा गोळा केला असेल तर कदाचित निवडणूका होऊ शकतात. परंतु ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होऊ नयेत या भूमिकेवर महाविकास आघाडी सरकार असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणार नाही. प्रयत्न दोन्ही बाजुने सुरू आहेत,” असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

“उपरोधिकदृष्टया सदाभाऊ खोत भाजपाच्या विरोधात बोलू शकत नाहीत. कारण त्यांची विधानपरिषदेची मुदत संपत आली आहे. त्यामुळे काय बोलायचं म्हणून ‘शालीतून जोडा’ त्यांच्याच आमदाराने भाजपाला मारला आहे,” अशी मिश्किल टीका जयंत पाटील यांनी केली.

“सदाभाऊ खोतांच्या वक्तव्यावर हसायचं की रडायचं हेच कळत नाही. सदाभाऊ खोत यांनी महागाईचे समर्थन केले आहे. या देशात महागाईने सामान्य जनता होरपळत आहे, एवढी प्रचंड महागाई आहे. ६० रुपयावर पेट्रोल गेले तरी केंद्रात बसलेले नेते मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत होते. आज १२५ वर पेट्रोल गेले. परवाच गॅस ५० रुपयांनी वाढला. देशभर लोकांना महागाईची झळ बसली आहे त्यामुळे सदाभाऊ खोत यांनादेखील महागाईची झळ बसली असेल तर कदाचित उपरोधाने ते बोलले असतील,” अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

“राज ठाकरे यांना कोण कशाला इजा करेल. मला वाटत नाही राज ठाकरे यांना धोका आहे पण त्यांना भीती वाटत असेल तर संरक्षण दिले पाहिजे. आमची कोणतीही तक्रार नाही,” असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

“अलीकडे राज्यात नवीन फॅशन सुरू झाली आहे. केंद्र सरकारमधूनच संरक्षण पुरवलं जातं आणि त्यातच दोन – तीन उदाहरणे झाली आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्र सरकार राज्यातील व्यक्तींना संरक्षण देत आहे. त्यामुळे तुमची भाजपाबरोबर चांगली मैत्री असेल तर तुम्हालाही संरक्षण देण्याची व्यवस्था होऊ शकते,” असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.