…तर मी गावस्करांना दिलेला म्हाडाचा प्लॉट रद्द केला असता; जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

पुढील तीन वर्षांत भूखंडावर बांधकाम पूर्ण करून त्याचा वापर सुरू करण्याचे बंधन गावस्कर यांच्यावर आहे

NCP, Jitendra Awahad, Sunil Gavaskar, Mhada Plot
पुढील तीन वर्षांत भूखंडावर बांधकाम पूर्ण करून त्याचा वापर सुरू करण्याचे बंधन गावस्कर यांच्यावर आहे

क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांना निवृत्तीनंतर ३३ वर्षांपूर्वी राज्य सरकारने वांद्रे-कुर्ला संकुल येथे मोक्याच्या ठिकाणी दिलेल्या भूखंडावर क्रिकेटबरोबरच बॅडमिंटन, फुटबॉल, टेबल टेनिस या खेळांनाही परवानगी देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. मात्र पुढील तीन वर्षांत भूखंडावर बांधकाम पूर्ण करून त्याचा वापर सुरू करण्याचे बंधन घालण्यात गावस्कर यांच्यावर आले आहे. दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गावस्कर नसते तर आपण म्हाडाचा प्लॉट रद्द केला असता असं सांगत टीका केली आहे.

गावस्कर यांना दिलेल्या भूखंडावर इतर खेळांनाही परवानगी

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं असून आतातरी सुनिल गावस्करांनी क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच इच्छा असल्याचं म्हटलं आहे. “गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावस्कर यांच्यासाठी बदलला. आतातरी सुनिल गावस्करांनी तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच इच्छा,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

“जर सुनिल गावस्कर नसते तर कदाचित त्यांना आज देण्यात आलेला म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता,” असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं आहे. “ज्या दिवशी सुनिल गावस्कर फिलिप्स डिफ्रायटेसच्या चेंडूवरती त्रिफळाचीत झाले, त्या दिवसापासून जवळ-जवळ माझा क्रिकेटमधला इंटरेस्टच संपला. स्टेडियममधून रडत बाहेर पडलो होतो,” अशी आठवणही आव्हाडांनी सांगितली आहे.

काय आहे प्रकरण –

क्रिकेट प्रशिक्षणासाठी ‘सुनिल गावस्कर क्रिकेट फाऊंडेशन’ला हा भूखंड देण्यात आला होता. मात्र दोन हजार चौरस मीटरच्या या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंडाचा इतक्या वर्षात प्रशिक्षणाच्या दृष्टीने कोणताच विकास झाला नव्हता. आता म्हाडासोबत ३० दिवसांच्या आत भाडेकरार करावा आणि करार केल्यानंतर एक वर्षाच्या आत भूखंडावर बांधकाम सुरू करण्याच्या व तीन वर्षांत ते पूर्ण करून तिथे प्रशिक्षण सुरू करण्याच्या अटीवर गावस्कर फाऊंडेशनला क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांच्या प्रशिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच हा भूखंड क्रिकेट प्रशिक्षणासाठी देण्यात आल्याने इतर खेळांसोबतच क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जाईल, याची हमी फाऊंडेशनला द्यावी लागणार आहे. या केंद्रातून मिळणाऱ्या नफ्याच्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम सरकारकडे जमा करावी लागणार आहे.

गावस्कर क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर १९८८ साली क्रिकेट प्रशिक्षण देण्याच्या अटीवर त्यांना हा भूखंड म्हाडाकडून देण्यात आला होता. परंतु अत्यंत मोक्याच्या जागी असलेला हा भूखंड कुठल्याही वापराविना पडून असल्याने काही संस्थांनी तो आपल्याला मिळावा यासाठी म्हाडाकडे मागणी केली. दरम्यान, भूखंड देताना घातलेल्या अटी-शर्ती शिथिल करण्याची मागणी गावस्कर यांनी जानेवारी, २०२० आणि मार्च, २०२१ साली म्हाडाला पत्र लिहून केली. ती मान्य करत गावस्कर यांना बॅडमिंटन, फुटबॉल, टेबल टेनिस या खेळांच्या प्रशिक्षणासही परवानगी दिली आहे.

याआधी संबंधित भूखंडावर नोव्हेंबर, २००२ साली हेल्थ क्लब, फिटनेस सेंटर, जिम्नॅशिअम, स्विमिंग पूल, स्क्वॅश तसेच प्रशिक्षणार्थींसाठी राहण्याची व्यवस्था आणि स्पोर्ट्स कॅफेटेरिया इत्यादी सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. आता क्रिकेटसोबत इतरही खेळांचे प्रशिक्षण या ठिकाणी मिळेल. याशिवाय खेळाडूंना दुखापत झाल्यास उपचारासाठी आरोग्य केंद्र, क्रीडाविषयक तज्ज्ञांची व्याख्याने आयोजिण्यासाठी सभागृह उभारता येणार आहे. तसेच आधीचे ‘इनडोअर क्रिकेट स्टेडियम’ऐवजी ‘मल्टी फॅसिलिटीज स्पोर्ट्स सेंटर विथ इनडोअर अ‍ॅण्ड आऊटडोअर फॅसिलिटीज’ असे नाव बदलण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp jitendra awhad former indian cricketer sunil gavaskar mhada plot sgy