scorecardresearch

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर आव्हाडांची टीका, म्हणाले “१०० वेळा खंडोबा आणि २०० वेळा तुळजापूरला…”

राज ठाकरे ५ जून रोजी सहाकाऱ्यांसमवेत अयोध्येला जाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दोन मोठ्या घोषणा केल्या. महाराष्ट्र दिनी १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असून ५ जून रोजी सहाकाऱ्यांसमवेत अयोध्येला जाणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासंबंधी विचारण्यात आलं असता आव्हाड म्हणाले की, “राज ठाकरे अयोध्येला जाणार की अमृतसरला याच्याशी मला काय करायचं आहे. राज ठाकरेंना पार मोसादची किंवा सीआयएची सुरक्षा मिळू देत…मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही”.

“देशात महागाई असताना अशा मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे. कोणी अयोध्येत गेलं काय, राम मंदिरात गेलं काय.. यामुळे महागाई कमी होणार आहे का? त्याकडे दुर्लक्ष व्हावं आणि महागाईकडे दुर्लक्ष व्हावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत,” असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. लोक श्रीराम म्हणत आहेत, पण महागाई इतकी वाढू देऊ नका की राम नाम सत्य है म्हणावं लागेल असंही यावेळी ते म्हणाले.

राज ठाकरेंना मोदी सरकार सुरक्षा देणार असल्याची चर्चा असतानाच आव्हाडांची प्रतिक्रिया, म्हणाले “अगदी मोसाद, सीआयए…”

“राज ठाकरेंना धमक्या आल्या असतील. आम्ही कुठे नाकारतो आहोत. त्यांना झेड प्लस द्या आमचं काहीच म्हणणं नाही. बाळा नांदगावकर यांनी लिहिलेल्या पत्रावर केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधान निर्णय घेतील. लोकशाहीत प्रत्येकाला सुरक्षित ठेवणं शासनाची जबाबदारी आहे,” असंही आव्हाड म्हणाले.

“आम्ही १०० वेळा खंडोबा आणि २०० वेळा तुळजापूरला जातो, ते काय जाहीर करुन जातो का? देवळात जाताना काय सांगायचं नसतं. तुमचे आणि देवाचे संबंध असतात. तुम्ही काय समाजाला घेऊन जाता का? मग पिकनिक काढा,” असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp jitendra awhad on mns raj thackeray ayodhya sgy

ताज्या बातम्या