बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी संत तुकाराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यानंतर भाजपासहीत सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यावर जोरदार टीका केली होती. तसेच वारकरी संप्रदायाकडून देहू संस्थान येथे आंदोलन करुन धीरेंद्र शास्त्रींचा निषेध करण्यात आला होता. या प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह असून मी त्यामुळे व्यथित झालो आहे. महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने मी त्यांचा निषेध करतो. तसेच बेताल वक्तव्यांविरोधात आता कायद्याची गरज आहे. लाखो वारकरी बांधव तुकाराम महाराजांच्या वचनाला आजही मानतो. हे अश्लाघ्य वक्तव्य केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्री महाराजांवर कारवाई झाली पाहीजे. तसेच आगामी अधिवेशनात हा मुद्दा आम्ही उपस्थित करुन यावर कायदा करण्याची मागणी करणार आहोत.
महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना शासन करणारा कायदा करावा
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील पक्षकार्यालायत काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महापुरुषांचा अपमान करण्याचे काही जणांचे काम जाणीवपूर्वक चालले आहे. यामध्यमातून महागाई, बेरोजगारी यावरील लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम सुरु आहे. २७ फेब्रुवारीला राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. तेव्हा अधिवेशनात हा मुद्दा मांडून यासंबंधी कायदा करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. ज्याप्रकारे अंधश्रद्धा व जादूटोना विरोधी कायदा करण्यात आला आहे. तसाच महारापुरुषांच्या विरोधात जे वाचाळवीर बेताल वक्तव्य करुन नवीन समस्या निर्माण करतात. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होतो. कुणाच्यातरी भावना दुखावल्यामुळे कायदा हातात घेतला जातो, कोण शाई फेकण्याचा प्रयत्न करतो, निषेधासाठी काळे झेंडे दाखविले जातात. हे सर्व थांबविण्यासाठी महापुरुषांचा अपमान होऊ नये, यासाठी काहीतरी कायदा केला पाहीजे.”
हे वाचा >> “…तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही”, म्हणत अनिल परब यांचं किरीट सोमय्यांना खुलं आव्हान
किरीट सोमय्या यांच्या आव्हानावरही भाष्य
भाजपाचे नेते किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्यात वांद्रे येथील कार्यालय तोडण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. किरीट सोमय्या या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी वांद्रे येथे येणार होते. त्यावरुन अनिल परब यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी तपासणीसाठी जाऊ, अशी भूमिका घेतली. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ठमहाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती असेल त्या प्रत्येकाला संविधानाने काही अधिकार दिलेले आहेत. त्याचा वापर करत असताना जे नियम घालून दिलेले आहेत, त्याचा कुणीही भंग करु नये. ही कृती योग्य की अयोग्य यावर भाष्य करण्याआधी या प्रकरणाची पार्श्वभूमी तपासावी लागेल. तरी सर्व व्यक्तींनी नियमांचा आणि कायद्याचा आदर केला पाहीजे.”
प्रकाश आंबेडकरांवर म्हणाले ‘नो कॉमेंट्स’
२०२४ साली बिगर भाजपाची सत्ता आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना तुरुंगात टाकू, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यावर प्रश्न विचारला असता अजित पवार एका वाक्यात म्हणाले ‘नो कॉमेंट्स’.