Nawab Malik ED Inquiry : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतंं. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.

जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजेपासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती.

”देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू” असा इशारा नवाब मलिक यांनी या अगोदर दिला होता.

तर, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावलेली आहे. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर नवाब मलिक आले आहेत.

Live Updates
21:04 (IST) 23 Feb 2022
३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी

नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं होतं. या ठिकाणी दोन तासांपासून युक्तिवाद सुरू होता. ईडीकडून नवाब मलिक यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी कऱण्यात आली होती. मात्र न्यायालयाने आठ दिवसांचीच कोठडी मंजूर केली आहे.

20:10 (IST) 23 Feb 2022
ममता बॅनर्जीही नवाब मलिकांच्या पाठीशी; शरद पवारांना केला फोन

राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलून आपला पाठिंबा व्यक्त केला.

18:38 (IST) 23 Feb 2022
पिंपरी-चिंचवड : ''गांधी लढे थे गोरो से हम लढेंगे चोरो से '' राष्ट्रवादीची घोषणाबाजी

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडी ने अटक केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहेत पुण्या पाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरू केलं आहे. कार्यकर्त्यांनी केंद्रसरकरच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे. ''गांधी लढे थे गोरो से हम लढेंगे चोरो से, केंद्र सरकार जब, जब डरती है ईडी को आगे करती है!'' अशा घोषणा देत भाजपावर निशाणा साधला गेला आहे. 

18:09 (IST) 23 Feb 2022
नवाब मलिकांना ईडी कडून अटक झाल्याने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन सुरू

अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर ईडी कडून अटक करण्यात आल्याने, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन सुरू केलं आहे.

18:02 (IST) 23 Feb 2022
न्यायालयात दोन तासांपासून युक्तिवाद सुरू ; ईडीने १४ दिवसांची कोठडी मागितली

नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं आहे. या ठिकाणी दोन तासांपासून युक्तिवाद सुरू आहे. ईडीकडून नवाब मलिक यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी कऱण्यात आली आहे.

17:52 (IST) 23 Feb 2022
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासही पक्षाचे काही अन्य वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.

17:20 (IST) 23 Feb 2022
विशेष न्यायालयात तासभरापासून सुनावणी सुरू

नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं आहे. या ठिकाणी जवळपास तासभरापासून सुनावणी सुरू आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नवाब मलिकांबाबत नेमका काय निर्णय घेतला जातो, याची सर्वांनी उत्सुकता आहे. तर दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.

17:17 (IST) 23 Feb 2022
नवाब मलिकांच्या अटकेवर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेवर आश्चर्य व्यक्त करतानाच आपण कुणासमोर झुकणार नसल्याचं म्हटलं आहे. “ते इतका अतिरेक करतील हे जरा आश्चर्यकारक होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी टोकाची भूमिका याआधी कुणी घेतली नव्हती. भाजपातले काही लोक सातत्याने ट्वीट करत होते की १५ दिवसांनी अटक होईल, छापे पडतील. ते खरं झालंय. कारण ईडी आणि भाजपा एकच आहे असा अर्थ आता काढावा लागेल”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

17:12 (IST) 23 Feb 2022
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सिलव्हर ओक वर दाखल होण्यास सुरूवात

अल्पसंख्यामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज ईडी कडून आठ तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे निवास्थान असलेल्या सिलव्हर ओक येथे दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.

17:01 (IST) 23 Feb 2022
मला ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणलं तिथं समन्सवर सही करण्यास सांगितलं - नवाब मलिक

मला ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणलं तिथं समन्सवर सही करण्यास सांगितलं, असं नवाब मलिक यांनी न्यायालयात सांगितलं आहे.

16:55 (IST) 23 Feb 2022
नवाब मलिकांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं

अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता त्यांना विशेष न्यायालयात आणलं गेलं आहे. या ठिकीणी ईडीतर्फे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह युक्तिवाद करणार आहेत. अनिल सिंह कोर्टात हाजर झाले असून, बचावपक्षाचे वकिलही उपस्थित आहेत. नवाब मलिकांतर्फे कायदेतज्ञ अमित देसाई युक्तिवाद करणार आहेत. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.

16:53 (IST) 23 Feb 2022
नवाब मलिकांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं

अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता त्यांना विशेष न्यायालयात आणलं गेलं आहे. या ठिकीणी ईडीतर्फे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह युक्तिवाद करणार आहेत. अनिल सिंह कोर्टात हाजर झाले असून, बचावपक्षाचे वकिलही उपस्थित आहेत. नवाब मलिकांतर्फे कायदेतज्ञ अमित देसाई युक्तिवाद करणार आहेत. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.

16:48 (IST) 23 Feb 2022
नवाब मालिकांनी विचारलेले प्रश्न भाजपाच्या जिव्हारी लागल्याने त्यांच्याविरोधात ED ची कारवाई - बाळासाहेब थारोत

“नवाब मालिकांनी विचारलेले प्रश्न भाजपाच्या जिव्हारी लागल्याने त्यांच्याविरोधात ED ची कारवाई. अशा प्रकारच राजकारण या देशात कधीही झालं नाही, याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे पण ते यशस्वी होणार नाही.” असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

16:22 (IST) 23 Feb 2022
मालिकांना अपेक्षेप्रमाणे अटक; भाजपा आमदाराची प्रतिक्रिया

मालिकांना अपेक्षेप्रमाणे अटक झाली आहे. कारवाई योग्य दिशेने सुरू आहे. यातून एनसीपी आणि दाऊद कनेक्शन नक्कीच उघड होईल. बरेचजण गोत्यात येतील, अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

15:46 (IST) 23 Feb 2022
उद्धव ठाकरे सरकारच्या सर्व घोटाळेबाजांना हिशोब द्यावा लागेल - किरीट सोमय्या

“अनिल देशमुख यांच्यानंतर मलिक आणि नंतर अनिल परब. उद्धव ठाकरे सरकारच्या सर्व घोटाळेबाजांना हिशोब द्यावा लागेल. ” अशा शब्दांमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नवाब मलिक यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

15:39 (IST) 23 Feb 2022
''अटक केली आहे पण घाबरणार नाही, आम्ही....'' - नवाब मलिक यांचं विधान

''अटक केली आहे, पण घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू,” दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आठ तासांच्या चौकशीनंतर ईडी कार्यालयाबाहेर आल्यावर अशी प्रतिक्रिया दिली.

15:32 (IST) 23 Feb 2022
'पीएमएलए' अंतर्गत ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे.

मनी लाँडिरग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए) अंतर्गत ईडीने अल्पसंख्याकमंत्री नवाब मेल्क यांना अटक केली आहे.

15:14 (IST) 23 Feb 2022
नवाब मलिक यांनी ईडी कडून अटक करण्यात आली आहे

राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना जवळपास आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

15:12 (IST) 23 Feb 2022
आठ तासांच्या चौकशीनंतर अखेर नवाब मलिक ईडीच्या कार्यालयाबाहेर आले

आठ तासांच्या चौकशीनंतर अखेर नवाब मलिक ईडीच्या कार्यालयाबाहेर आले आहेत. मलिक कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यालयाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. नवाब मलिकांना जेजे रूग्णालयाकडे नेण्यात आलं आहे.

14:49 (IST) 23 Feb 2022
देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावरून नवाब मलिक यांच्यावर ईडी कारवाई करतेय - माजिद मेमन

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत येण्याची घाई लागल्यामुळे केवळ महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवाब मलिक यांच्यावर त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आले आणि त्या आरोपांच्या आधारावर ईडी कारवाई करत आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार माजिद मेमन यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच, नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीकडून जमीन घेतल्याचे प्रकरण १७ वर्षानंतर जर बाहेर काढले जात असेल तर न्यायाधीशांकडूनही हा प्रश्न विचारला जाईल. न्यायालय तपास अधिकाऱ्यांचे कान धरतील, असेही माजिद मेमन यावेळी म्हणाले.

14:34 (IST) 23 Feb 2022
ईडी कार्यालयाबाहेर सीआरपीएफची तुकडी देखील दाखल ; हालचाली वाढल्या

नवाब मलिक यांची सात तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. तर कार्यालयाबाहेर मोठ्याप्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेले आहेत. राजकीय वातावरण तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस दलासोबतच आता ईडी कार्यालयाबाहेर सीआरीपीएफची तुकडी देखील दाखल झालेली आहे.

14:18 (IST) 23 Feb 2022
नवाब मलिक यांची सकाळी ७ पासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची सकाळी ७ वाजल्नयापासून ईडी कार्यालायात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. तर ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठिय्या देऊन बसलेले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

13:39 (IST) 23 Feb 2022
मोदी सरकारचा वेताळ नवाब मलिक यांच्या मागे येणार हे माहितच होते - सचिन सावंत

''मोदी सरकारचा वेताळ नवाब मलिक यांच्या मागे येणार हे माहितच होते. मविआ सरकार बदनाम करुन पाडण्याची सुपारी यंत्रणांना दिली आहे. देशात पुतीन मॉडेल चालू आहे. सत्तेसाठी केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग करणारी भाजपा पिसाळली आहे. या विरोधात एकत्र येऊन लढूच पण जनतेने डोळे उघडून हे पहावे.'' अशा शब्दांमध्ये काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी नवाब मलिकांवर ईडी करून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली गेली आहे.

13:36 (IST) 23 Feb 2022
नवाब मलिकांवर ईडीने सुडबुद्धीने कारवाई केलेली आहे - नाना पटोले

राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र सरकारविरोधात आवाज उठवल्यानेच ईडीच्या माध्यमातून कारवाई केलेली असून आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीशी आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

13:32 (IST) 23 Feb 2022
मुख्यमंत्रीपद गमवल्यापासून फडणवीसांकडून ठाकरे सरकार पाडण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न - राष्ट्रवादी काँग्रेस

मुख्यमंत्रीपद गमवल्यापासून देवेंद्र फडणवीस व भाजपाकडून राज्यातील ठाकरे सरकार पाडण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे. मग कायदेशी, बेकायदेशीर अथवा कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याची त्यांची तयारी आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

13:19 (IST) 23 Feb 2022
लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे : गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील

“केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून शासकीय यंत्रणांना राजकीय आयुध म्हणून वापरल्याने लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी नवाब मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.”अशा शब्दांमध्ये गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिकांवर ईडी करून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली गेली आहे.

13:14 (IST) 23 Feb 2022
“जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता के गलीयों से...” ; नवाब मलिकांच्या कार्यालयाकडू ट्वीट

राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. जवळपास सहा तासांपासून त्यांची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, ईडी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिकांच्या कार्यालयाकडून एक ट्वीट करण्यात आलं आहे. “जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता के गलीयों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इंक्लाब के नारो से...” असं या ट्वीटमध्ये म्हटलं गेलं आहे.

12:55 (IST) 23 Feb 2022
“ईडीला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर...” ; यशोमती ठाकूर यांनी साधला निशाणा

“ईडीला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या, शिवाजी पार्कात या ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जणं एकत्र भेटू आणि एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७० चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो. महाविकास आघाडीची एकजूट तुटणार नाही, उलट मजबूत होतेय.” असं म्हणत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी नवाब मलिकांवर ईडी करून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.

12:52 (IST) 23 Feb 2022
केंद्र सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे निंदनीय - जितेंद्र आव्हाड

“केंद्र सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे हे निंदनीय आहे. यातून संविधान व लोकशाही विरोधी काम होते.” अशा शब्दांमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नवाब मलिकांवर ईडी करून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

12:45 (IST) 23 Feb 2022
नवाब मलिक यांची कारस्थानं आता हळूहळू जनतेसमोर येत आहे - किरीट सोमय्या

“नवाब मलिक यांची कारस्थान आता हळूहळू जनतेसमोर येत आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, की अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात राहू शकते का? याबाबत जरा तपास करावा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या माफियाखोरांना मदतच करत असतात.” असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

12:24 (IST) 23 Feb 2022
दाऊद मालमत्ता खरेदी करणाऱ्याची चौकशी करणाऱ्यावर NCP, शिवसेना, कॅाग्रेस टीप गाळत आहेत - केशव उपाध्ये

“राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळची संपात स्थिती गंभीर आहे. राज्यात विद्यार्थी परिक्षागोंधळामुळे अडचणीत आहेत.राज्यात वाढत्या वीज बिलांमुळे सामान्य संकटात आहे. पण याकडे लक्ष देण्याऐवजी दाऊद मालमत्ता खरेदी करणाऱ्याची चौकशी करणाऱ्यावर सत्ताधारी NCP, शिवसेना, कॅाग्रेस टीप गाळत आहेत.” अशा शब्दांमध्ये भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

12:11 (IST) 23 Feb 2022
ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन सुरु

ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

11:53 (IST) 23 Feb 2022
“सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी, विनाकारण मारी धाडीवर धाडी” - अमोल कोल्हे

“सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी, विनाकारण मारी धाडीवर धाडी. सलते सत्तेवरील महा-आघाडी, म्हणून कमळाबाई ती लाविते काडी. तपासयंत्रणा झाल्या कमळीच्या सालगडी, पाकळ्यांमध्ये नाहीत का काहीच भानगडी?, पण लक्षात ठेवा... पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादी गडी.” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी नवाब मलिकांवर ईडी करून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. शिवाय, भाजपावर देखील निशाणा साधला गेला आहे.

11:45 (IST) 23 Feb 2022
दाऊदशी संबंध ठेवणे, व्यवहार करणे हे त्यांच्या दृष्टीने फारसे गंभीर नाही? - अतुल भातखळकर

“मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 'हे होणारच होते', असे उसासे सोडलेत. दाऊदशी संबंध ठेवणे, व्यवहार करणे हे त्यांच्या दृष्टीने फारसे गंभीर नाही ? नसेल तर त्याची काही विशेष करणे आहेत का?” असं म्हणत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर ईडी करून करण्यात आलेल्या कारवाईवर शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर भातखळकर यांनी ट्वीट केलं आहे.

11:40 (IST) 23 Feb 2022
पाच तासांपासून नवाब मलिकांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू

राज्याचे अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरी आज पहाटेच ईडीचे पथक जाऊन धडकले होते. त्यानंतर नवाब मलिक यांना ईडी कार्यलायात चौकशीसाठी नेले गेले आहे. तिथे जवळपास पाच तासांपासून ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांची चौकशी करत आहेत. तर, कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

11:35 (IST) 23 Feb 2022
ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

आज सकाळी नवाब मलिक यांनी चौकशीसाठी ईडी कार्यलयात आणलं गेल्यानंतर आणि ही बातमी बाहेर आल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ईडी कार्यलयाबाहेर जमण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ईडी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

11:27 (IST) 23 Feb 2022
“मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी....!” ; आशिष शेलारांनी लगावला टोला

“मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी....! असं म्हणताना, ज्याने खीर खाल्ली नाही, त्याने घाबरण्याचे कारण नाही. पण ज्याने ज्याने खीर खाल्ली त्याने त्याने किती ही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच!” असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे.

11:20 (IST) 23 Feb 2022
...हे काय महाविकास आघाडी सरकार नाही ; तर कोर्ट ED ला जाब विचारेल - भाजपाचा शरद पवारांवर निशाणा

''शरद पवारजी, आरोप केल्याने, पत्रकार परिषद घेतल्याने कारवाई करायला हे काही राज्यातील महाविकास आघाडी सरकार नाही. चौकशी ही पुराव्याच्या आधारावर होते. जर निर्दोष असतील तर सुटतील. नवाब मलिक जास्त बोलत होते म्हणून ED कारवाई करत असेल. तर कोर्ट ED ला जाब विचारेल.'' असं म्हणत भाजपाने ट्वीटद्वारे शरद पवार यांनी नवाब मलिकांवरील कारवाईवरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

11:15 (IST) 23 Feb 2022
“ना डरेंगे ना झुकेंगे! Be ready for 2024” - नवाब मलिक कार्यालयाकडून ट्वीट

“आज सकाळी ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या निवास्थानी आलं होतं. ते नवाब मलिक यांनी आपल्या वाहनात ईडी कार्यालयात घेऊन गेले आहेत. अॅड. अमीर मलिक नवाब मलिक यांचे चिरंजीव हे देखील नवाब मलिक यांच्यासोबत गेले आहेत.” असं ट्वीट नवाब मलिक यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

10:49 (IST) 23 Feb 2022
नवाब मलिक जे काही खरे आहे ते सांगतील; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

विरोधात असताना ईडीच्या नोटीस येतात आणि पक्ष बदलल्या नंतर ती नोटीस विरघळून जाते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. वाचा सविस्तर..

10:47 (IST) 23 Feb 2022
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडी कार्यालयावर धडकणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ईडीचे अधिकारी सकाळीच चौकशीसाठी घेऊन गेल्यानतंर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर जाऊन धडकणा असून, तिथे आंदोलन होणार आहे.

10:45 (IST) 23 Feb 2022
२०२४ पर्यंत हे सगळं चालेल त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत - संजय राऊतांचा केंद्रीय यंत्रणांना इशारा

''२०२४ पर्यंत हे सगळं चालेल त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत.'', असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणासह भाजपाला इशारा दिला आहे. तसेच, ''२०२४ नंतर ज्या गोष्टी घडणार आहेत त्याची तयारी या तपास यंत्रणांनी ठेवावी.'' असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आहे. वाचा सविस्तर...

10:39 (IST) 23 Feb 2022
नवाब मलिकांची चौकशी सुरु असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली असून नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम कदाचित चालू झालेलं दिसत आहे अशी टीका केली आहे. ते म्हणाले की, “हा सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणखी प्रकार आहे, कोणतीही, सूचना ने देता पहाटे सहा वाजता येऊन ईडी स्वतःच पोलीस आणत राज्यातील मंत्र्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता घेऊन जाणं ही नियमांची पायमल्ली आहे”.

10:36 (IST) 23 Feb 2022
...मात्र सत्याचा आवाज कोण दाबू शकत नाही - क्लाईड क्रास्टो

''केंद्रातील भाजपा सरकारविरोधात ठाम भूमिका आणि अनेक कारनामे उघड करणारे राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र सत्याचा आवाज कोण दाबू शकत नाही.'' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, केंद्रातील भाजपसरकार महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पक्षाचे प्रवक्ते म्हणून जोरदार आवाज उठवला आहे. त्याचाच भाग म्हणून नवाब मलिक यांच्याविरोधात अशाप्रकारची कारवाई केली जात आहे. मात्र सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही. असंही ते म्हणाले आहेत.

10:26 (IST) 23 Feb 2022
नवाब मलिकांवर ईडीकडून झालेल्या कारवाईवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रियी, म्हणाले...

''आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे घडेल. कारण, नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात. त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना अशाप्रकारे त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्याबद्दल अधिक भाष्य करण्याची गरज नाही.'' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

10:23 (IST) 23 Feb 2022
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आता मलिकांच्या घऱाबाहेर गर्दी सुरू झाली आहे.

10:21 (IST) 23 Feb 2022
नवाब मलिक यांच्या घराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमण्यास सुरूवात

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पहाटेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरून चौकशीसाठी नेल्याचं वृत्त समोस येताच, राष्ट्रवादी काँग्रसेचे कार्यकर्ते नवाब मलिकांच्या घराबाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे.

10:18 (IST) 23 Feb 2022
पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिकांची घरी धडरकलं

जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं

10:17 (IST) 23 Feb 2022
नवाब मलिक ईडीच्या रडावर

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडावर आले आहेत. प्राप्त माहितीनुसार नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे.