किमान समान कार्यक्रमावर राज्यातील सरकार स्थापन झालं आहे. कोणीही कोणाकडून काहीही लिहून घेतलं नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं किमान समान कार्यक्रमासाठी सह्या केल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची बोलण्याची पद्धत चुकीची आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी चव्हाणांवर टीका केली.

घटनेच्या चौकटीत राहून सरकार काम करेल, असे शिवसेनेकडून लेखी आश्वासन महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी काँग्रेसच्या सहभागासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मागितले होते. जे सरकार स्थापन होईल ते घटनेच्या चौकटीत काम करेल, असे आश्वासन शिवसेनेकडून घ्या, असं सोनिया गांधी यांनी आम्हाला सांगितले होते, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलं. आपण तीन पक्षाच्या सरकारच्या किमान समान कार्यक्रमाबद्दल बोललो, हा कार्यक्रम संविधानाला अनुसरून तयार केलेला आहे, त्याप्रमाणे सरकारचं काम चाललं पाहिजं, अशी आपली भूमिका असल्याचं अशोक चव्हाण यांनी नंतर सांगितलं होतं.

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, अशोक चव्हाण नेमके काय म्हणाले माहिती नाही, परंतु संविधानाच्या चौकटीतच सरकार चालते, ते सगळ्यांना बंधनकारक आहे. किमान समान कार्यक्रम ही संविधानाची बांधिलकी आहे, त्या प्रमाणेच काम सुरू आहे. तर यावर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. अशोक चव्हाण यांनी मात्र आपण किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात बोलल्याचे म्हटले आहे. किमान समान कार्यक्रम हा तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन तयार केलेले ते लिखित स्वरूपातील दस्तऐवज आहे. त्या दस्तऐवजाप्रमाणे सरकारचा कारभार चालला पाहिजे, अशी आपण भूमिका मांडल्याचे त्यांनी लोकसत्ताला बोलतना सांगितलं होतं.