मलिक यांची टीका, भाजपने आरोप फेटाळले

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या दिल्ली व मुंबईत बैठका झाल्यानंतर,  महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व नेत्यांना लक्ष्य के ले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले. या बैठका झाल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. मलिक यांचे आरोप भाजपने फे टाळून लावले आहेत.

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई सुरू के ली आहे. त्या संदर्भात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी, केंद्र सरकार सीबीआय, ईडी व इतर काही तपास संस्थांना हाताशी धरून भाजपविरोधीतील राजकीय नेत्यांना लक्ष्य केले जात आहे, अशी टीका केली.

दरेकर यांचे प्रत्युत्तर

स्वत:ला अपयश आले की केंद्रावर आरोप, करोनाचा प्रादुर्भाव वाढला की सामान्य जनतेवर खापर फोडायचे, खरे तर आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत असा टोला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मलिक यांना लगावला.