राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे अडचणीत?; महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीकडून तब्बल सात तास चौकशी

प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक यांच्या लिलावात एक साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप

NCP, Prajakt Tanpure, money laundering, Maharashtra State Co operative Bank, प्राजक्त तनपुरे, ईडी,
प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक यांच्या लिलावात एक साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप

सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची चौकशी केली जात असल्याने राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असताना यामध्ये मंगळवारी आणखी एका नावाची भर पडली. ईडीकडून मंगळवारी महाविकास आघाडीमधील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची चौकशी करण्यात आली. ईडीकडून आधीच अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, अर्जुन खोतकर, अशा अनेक नेत्यांची चौकशी सुरु असताना आता प्राजक्त तनपुरे यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून ही चौकशी करण्यात आली. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक यांच्या लिलावात प्राजक्त तनपुरे यांनी एक साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप आहे. ईडीने समन्स बजावत प्राजक्त तनपुरे यांना हजर राहण्यास सांगितलं होतं. दुपारी ३ वाजता सुरु झालेली प्राजक्त तनपुरे यांची चौकशी १० वाजेपर्यंत सुरु होती. तब्बल सात तासांनी प्राजक्त तनपुरे ईडीच्या कार्यालयाबाहेर आले.

दरम्यान बाहेर आल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिल्याचं सांगितलं. मला आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ईडीने चौकशीला बोलावलेलं होतं. मात्र ईडीचे अधिकारी एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे तीन वाजल्यापासून चौकशीला सुरुवात झाली अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, “राज्य सहकारी बँकेसंदर्भात बोलावण्यात आलं होतं. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकार उत्तरं दिली आहेत. काही तांत्रिक गोष्टी ज्या आकडेवारीसहित माझ्याकडे उपलब्ध नाहीत त्यासाठी बोलावल्यास मी पुन्हा हजर होईन असं सांगितलं”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp leader prajakt tanpure ed money laundering maharashtra state co operative bank sgy

ताज्या बातम्या