करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडालेला असतानाच पारनेरमधील नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी उभारलेलं एक हजार बेड्सचं करोना केंद्र साऱ्या महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरलं. लंके यांच्या या कामाची दखल आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून त्यांना एक प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. यासंदर्भातील माहिती निलेश लंके यांनीच सोशल नेटवर्किंगवरुन फोटो शेअर करत दिली आहे. गुरुवारी दुपारी १ वाजता मुंबई येथील कार्यक्रमात आमदार लंके यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन संस्थेच्या वतीने गौरवण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना कालावधीमध्ये केलेल्या कामाबद्दल आपल्याला पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचं लंके यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पुरस्कार म्हणून देण्यात आलेलं प्रमाणपत्र स्वीकारत असल्याचा फोटो पोस्ट केलाय. “करोना काळात केलेल्या कामाबद्दल आज मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्कराने सन्मानित करण्यात आले. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला हा सन्मान मिळाला ही खूप मोठी गोष्ट आहे. हे सगळं शक्य झालं माझ्यावर प्रेम कऱणाऱ्या मायबाप जनतेमुळे आणि सहकाऱ्यांमुळे”, असं लंके यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये समावेश झाल्याने आमदार लंके यांनी करोना संकटकाळात केलेल्या सातत्यपूर्ण कामाला जागतिक परिमाण प्राप्त झाले आहे. करोना संसर्गाच्या काळात उल्लेखनीय काम केलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,अभिनेता सोनू सूद यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन’मध्ये यापूर्वीच समावेश झाला आहे.

देशातील पहिले आमदार

‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये समावेश झालेले नीलेश लंके देशातील पहिले आमदार ठरले आहेत.‘आयर्न मॅन’ किताब पटकावणारे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा समावेश ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये झाला. ते हा सन्मान मिळणारे देशातील पहिले सरकारी अधिकारी आहेत.

सुप्रिया सुळेंकडून अभिनंदन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही लंके यांचे पुरस्कार घेतानाचे दोन फोटो शेअर करत आनंद व्यक्त करतानाच लंके यांचं कौतुक केलंय. “अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी, पारनेर येथे आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर हे कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत दहा हजारांहून अधिक रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना आज मुंबई येथे ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. करोनाचा प्रादुर्भाव असताना निलेश लंके यांनी अतिशय उत्तम काम केले आहे. जनसेवेचा एक वेगळा आदर्श त्यांनी घालून दिला.त्यांना पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा,” असं सुप्रिया यांनी तीन ट्विट करुन म्हटलं आहे

या ट्विटला उत्तर देताना लंके यांनी सुप्रिया सुळेंचे आभार मानलेत. “आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे व आशीर्वादामुळे मला अजून जोमाने काम करण्याची प्रेरणा व ऊर्जा मिळते. आपण आणि माननिय ‘शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर’मधील रुग्णांशी संवाद साधून रुग्णांची विचारपूस केली होती. आपली कौतुकाची थाप ही सदैव माझ्या पाठीशी आहे. धन्यवाद ताई,” असं उत्तर लंके यांनी सुप्रिया यांना दिलं आहे.

केंद्रातच मुक्काम…

संसर्गामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्येबरोबरच मानसिक, सामाजिक, आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या विविध समस्यांचे निराकरण भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात (कोविड उपचार केंद्र) केले जाते. त्यासाठी पारनेर-नगरचे आमदार निलेश लंके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते अहोरात्र कष्ट घेत आहेत. आमदार लंकेनी कोविड उपचार केंद्रात मुक्काम ठोकला.

गरज पडल्यास खासगी रुग्णालयात पाठवण्याची सोय…

११०० खाटांच्या भाळवणी येथील कोविड उपचार केंद्रात १०० खाटांना प्राणवायूची सुविधा आहे. करोना संसर्गाची सामान्य लक्षणे असणाऱ्या तसेच प्राथमिक पातळीवर प्राणवायूची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जातात. आवश्यकता भासल्यास रुग्णांना पुढील उपचारासाठी संसर्गाच्या तीव्रतेनुसार पारनेर ग्रामीण रुग्णालय, बूथ रुग्णालय (नगर), जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच आवश्यकतेनुसार खासगी रुग्णालयात पाठवण्यात येते.

पारनेरच नाही नगर, पुण्यासाठीही ठरलं हे केंद्र आधार

भाळवणी येथील कोविड उपचार केंद्र पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाबरोबरच नगर, पुणे जिल्ह्यातील जनतेसाठी आधार केंद्र ठरले आहे. प्राथमिक अवस्थेतील संसर्ग झालेल्या रुग्णाला इतरत्र रुग्णालयात जागा मिळाली नाही तरी भाळवणी येथील कोविड उपचार केंद्रात हमखास मिळणार याची खात्री असते. कोणतीही चौकशी न करता रुग्ण थेट भाळवणी येथील उपचार केंद्रात दाखल होतात.

आपला आमदार आपल्याबरोबर २४ तास

या उपचार केंद्रात सरासरी ९०० रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णाची प्राणवायूची, तपमानाची तपासणी करण्यास मदत करतात.या दरम्यान रुग्णांच्या, कुटुंबीयांच्या अडचणी विषयी चौकशी सुरू असते. काही अडचणी असतील तर कार्यकत्र्यांमार्फत सोडवण्यात येतात. आपला आमदार आपल्याबरोबर २४ तास असल्याने रुग्णांना मोठा मानसिक आधार मिळतो. त्यातूनच रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होते. गेल्या महिनाभरात २७४३ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

रुग्णांना मानसिक आधार

रुग्णांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी पहाटे उपचार केंद्रात प्राणायाम, योगासने आणि हलके व्यायाम करून घेतले जातात. आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना प्रथिनयुक्त आहार दिला जातो. सकाळी न्याहरीत काढा, अंडी, फळे दिली जातात.एकवेळच्या जेवणात मांसाहार दिला जातो. रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रथिनयुक्त आहाराबरोबरच फळे, हळदीचे दूध रुग्णांना दिले जाते.

दररोज संध्याकाळी प्रवचन, वाद्यवृंद, जादूचे प्रयोग यापैकी एखाद्या धार्मिक अथवा मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. एका बाजूला करोना संसर्गाच्या पाश्र्वाभूमीवर सर्वत्र दहशतीचे, भीतीचे वातावरण असताना भाळवणी येथील उपचार केंद्रात उत्सवी वातावरण अनुभवायला मिळते.

करोनासदृश लक्षणे असणाऱ्या व गृहविलगीकरणात राहून खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णाला किमान २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो तर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना दीड लाख रुपये खर्च येतो. या पार्श्वभूमीवर असताना आमदार लंके यांच्या उपचार केंद्रात एक रुपयाही खर्च येत नाही.

सव्वा कोटी रुपयांची देणगी जमा

आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपचार केंद्राच्या मदतीसाठी हजारो हात सरसावले आहेत.गेल्या महिन्याभरात तब्बल १ कोटी २० लाख ३१३ रुपयांची देणगी जमा झाली आहे. धान्य, भाजीपाला, फळे, दूध, अंडी, किराणा याचा ओघ सुरूच आहे. वडनेर हवेली येथील जाणीव प्रतिष्ठानने दोन लाख रुपये खर्चाची जलशुद्धीकरण यंत्रणा उभारली आहे. भाळवणी येथील भुजबळ कुटुंबाने मंगल कार्यालय व आठ एकर जागा उपचार केंद्रांसाठी विनामोबदला उपलब्ध करून दिली आहे.

मागील वर्षी ४ हजार ६६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले

गेल्या वर्षी, संसर्गाच्या पहिल्या लाटेत,पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथे आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड उपचार केंद्रातून ४ हजार ६६८ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. यंदाची आकडेवारीची बेरीज केली असता एकूण १० हजारहून अधिक रुग्णांनी या केंद्राचा लाभ घेतलाय.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla nilesh lanke awarded with world book of records london for covid 19 related work scsg
First published on: 25-06-2021 at 09:51 IST