राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेवर हल्लाबोल केलाय. नारायण राणे यांनी जिल्हा बँकेसाठी मोठी लोकं आली तरीही मी त्यांना पुरून उरलो, त्यांचा पराभव करून दाखवला असं वक्तव्य केलं. यावर नवाब मलिक गल्लीच्या स्पर्धा जिंकल्यावर काही लोक वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न बघत आहेत, असं म्हणत टोला लगावला. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवाब मलिक म्हणाले, “काही लोक गल्लीच्या स्पर्धा जिंकल्यावर वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न बघत आहेत. पैशाची ताकद, गुंडगिरीच्या जोरावर लहान निवडणुका जिंकता येतील. इतके मोठे नेते आहेत त्यांनी उत्तर प्रदेशमधील २-४ जागांची जबाबदारी घेऊन जनतेतून निवडून आणण्याची घेतली तर त्यांना देशाचे मंत्री म्हणता येईल. गल्लीच्या राजकारणात दादागिरी करून यश मिळलं म्हणून राज्य आणि देशाच्या निवडणुकांचे निकाल आम्ही बदलू शकतो हे जास्त बोलणं आहे.”

यावेळी नवाब मलिक यांनी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आणि तेथील आघाडीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “अखिलेश यादव यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. त्यांनी शरद पवार यांच्या ३-४ तारखा मागितल्या आहेत. शरद पवार नक्कीच उत्तर प्रदेशमध्ये जातील. मलाही उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादीच्या जागांवर जाण्यासाठी सांगण्यात आलं आहे. अखिलेश यादव यांना देखील नक्कीच भेटू. आम्ही आघाडी करून निवडणूक लढत आहोत तर पक्षाच्या उमेदवारांसोबतच सामूहिक प्रचारात जिथं गरज असेल तिथं आम्ही जाऊ.”

“माझा स्वतःचं घर असलेला जिल्हा बलरामपूर जिल्हा आहे. तेथील आजूबाजूच्या १० जिल्ह्यांमधील लोक मुंबईत नोकरीसाठी येतात. त्यामुळे त्या जिल्ह्यांमध्ये जाण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल. उत्तर प्रदेशमधील आमच्या आघाडीला विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,” असंही नवाब मलिक यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp nawab malik criticize bjp minister narayan rane over district bank election pbs
First published on: 13-01-2022 at 19:16 IST