राष्ट्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांसंबंधी आपल्या आठवणींना उजाळा देत अनेक आठवणी सांगितलं. पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी शरद पवारांच्या नेतृत्वात २०२४ मध्ये पर्यायी सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी आपली एक आठवणही सांगितली. तसंच शरद पवारांचं तोंडभरुन कौतुकही केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आपल्या नेत्याचा आज वाढदिवस आहे. आजच्या दिवशी आपल्याला काहीतरी संकल्प करावा लागेल. देशात नक्कीच आज एक वैचारिक लढाई उभी करण्याची गरज आहे. आपल्या योद्धा ही लढाई जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल असा पूर्ण विश्वास आहे,” असं नवाब मलिक यावेळी म्हणाले.

“जिवंत मासे पाण्याच्या प्रवाहाविरोधात पोहत असतात आणि मृत मासे पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जातात. आज देशात वैचारिक संघर्ष सुरु असून काही लोकांना देशात वेगळी विचारधारा आणून आपण प्रस्थापित होऊ असं वाटत आहे. पण या वैचारिक लढाईत आमचा योद्धा जिंकेल आणि आम्ही त्यांच्यासोबत पूर्ण ताकदीने उभं राहू,” असा निर्धार नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

“२०२४ मध्येही पर्यायी सरकार उभं राहू शकतं”

“गेल्या काही वर्षांपासून मोदींविरोधात पर्याय कोण असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. दोन वर्षांपूर्वी देशातील कोणत्याही व्यक्तीने स्वप्नातदेखील शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येईल असा विचार केला नसेल. जर शरद पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊ शकतं तर २०२४ मध्येही पर्यायी सरकार उभं राहू शकतं,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

“ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे लोक वेगवेगळं बोलत असल्याचं वारंवार विचारलं जात आहे. जेव्हा वेगवेगळे बोलणारे असतील तेव्हा त्यांना एकत्र बसवणारी व्यक्ती असावी आणि ते काम आमचे नेते करतील असा विश्वास आहे. सर्व पक्ष शरद पवारांचं नक्की ऐकतील,” असं नवाब मलिक म्हणाले.

“मनातलं ओळखू शकत नाही तो पक्षाचा नेता, कार्यकर्ता नाही”

“शरद पवारांच्या मनात काय आहे हे कोणाला कळत नाही असं सगळे म्हणतात. पण ज्या नेत्याला, कार्यकर्त्याला आपल्या नेत्याच्या मनातील गोष्ट कळत नसेल तो पक्षाचा असू शकत नाही,” असं सागंत नवाब मलिकांनी काही वैयक्तिक अनुभव यावेळी सांगितले.

“भाजपासोबत शरद पवार जाणार असल्याचं वृत्त वारंवार येत असतं. १९९९ मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी झाल्यानंतर शरद पवार उपपंतप्रधान होणार असून महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार येणार आहे अशी चर्चा सुरु झाली. मी समाजवादी पक्षात होतो. सहयोगी पक्ष म्हणून काम करत होतो. कार्यकर्ते आणि इतर सगळे चर्चा करु लागले. मी त्यावेळी शरद पवार विचारधारेशी तडजोड करु शकत नाहीत असं सांगितलं होतं. शरद पवारांनीही तेच केलं आणि भाजपासोबत जाणार नाही असं स्पष्ट केलं,” अशी आठवण त्यांनी सांगितली.

“जेव्हा कधी माझ्यावर संकट आलं, दु:खाची वेळ आली तेव्हा शरद पवार यांचा फोन आला आणि चौकशी केली. जेव्हा एखादा नेता कार्यकर्त्यांसोबत दु:ख वाटून घेण्याचं, समजून घेण्याची क्षमता ठेवत असेल तर त्यापेक्षा महान व्यक्ती कोणी नाही. आज संपूर्ण देश मोठ्या अपेक्षेने शरद पवारांककडे पाहत आहे,” असं नवाब मलिक म्हणाले.

“वैचारिक संघर्ष झाल्याने मी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये जाणार होतो”

“मी समाजवादी पक्षात होतो. वैचारिक संघर्ष झाल्याने मी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये जाणार होतो. मंत्रालयातून निघालो, बीकेसीला पोहोचलो होतो. त्यावेळी एक फोन आला ‘मी शरद पवार बोलतोय’…माझे हात पाय थंड पडले. शरद पवारांचा फोन का आला? असा विचार करु लागलो. त्यांनी तुम्ही काँग्रेसमध्ये जात आहात का? असं विचारलं. मी हो सांगितल्यावर त्यांनी ‘नाही…तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं आहे’ असं सागंत दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलायला सांगितलं,” अशी आठवण नवाब मलिक यांनी सांगितली.

“शरद पवारजी तुम्ही मला निमंत्रण दिलं आणि पक्षात घेतलं. तुम्ही कार्यकर्त्यांना ओळखणारे नेते आहेत. आज शरद पवारांमुळे नवाब मलिकला महाराष्ट्र, देशात ओळखतात,” असं सांगत नवाब मलिक यांनी आभार मानले.

“मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू”

“मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत काही पक्ष प्रश्न उपस्थित करत आहेत. भाजपच्या काळात हे आरक्षण रद्द झाले तेव्हा भाजपला प्रश्न विचारण्याचे काम या पक्षाने केले नाही. येणाऱ्या काळात आम्ही मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू हा निर्धार व्यक्त करतो,” असं नवाब मलिकांनी म्हटलं.

“पवार साहेबांसारख्या योद्ध्याच्या पाठिशी उभे राहूया”

“काही लोक संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कुणीही संभ्रमित होऊ नये, असे माझे आवाहन आहे. जयंत यांनी सांगितले की, आज केंद्राच्या विरोधात बोललं तर घरी पाहुणे येतात. पण या पाहुण्यांना न घाबरता पवार साहेबांसारख्या योद्ध्याच्या पाठिशी उभे राहूया,” असं आवाहन नवाब मलिक यांनी यावेळी केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp nawab malik samajwadi party sharad pawar birthday nehru centre sgy
First published on: 12-12-2021 at 13:58 IST