राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘पहचान कौन’ असं म्हणत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा पहिल्या लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर करुन खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान दुसऱ्या एका ट्वीटमध्ये नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जन्मदाखल्याचा फोटो शेअर केला असून इथूनच घोटाळा सुरु झाल्याचा आरोप केला आहे.
“पहचान कौन”, नवाब मलिकांनी शेअर केला समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातला फोटो?
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यांनी पहचान कौन? असं उपहासात्मक ट्वीटदेखील केलं आहे. नवाब मलिक यांनी शेअर केलेला हा फोटो क्रॉप केल्याचं स्पष्ट दिसत आहे. हा फोटो समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील आहे.
यासोबत नबाव मलिक यांनी आणखी एक ट्वीट केलं असून यामध्ये समीर वानखेडेंशी संबंधित कागदपत्राचा फोटो शेअर केला आहे. “यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा’ असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे. हा फोटो समीर वानखेडे यांच्या जन्मदाखल्याचा आहे. यामध्ये त्यांचं नाव समीर दाऊद वानखेडे असून धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे.
नवाब मलिक यांनी जन्मदाखला शेअर करत समीर वानखेडे यांनी फर्जीवाडा करुन नोकरी मिळवली असा आरोप केला आहे.
समीर वानखेडे मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती –
समीर वानखेडे सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे पती आहेत. क्रांती आणि समीर वानखेडे यांचं २०१७ मध्ये लग्न झालं. त्यांना जुळी मुलंही आहेत.
नवाब मलिक यांनी ट्वीट केलेल्या फोटोमुळे समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नासंबंधी चर्चा सुरु झाली आहे. क्रांती रेडकरसोबत लग्न करण्याआधी समीर वानखेडे यांचं डॉ शबाना कुरेशी यांच्याशी विवाह झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
समीर वानखेडेंचं उत्तर –
दरम्यान, मलिक यांच्या या ट्विटला प्रत्युत्तर देताना समीर वानखेडे म्हणाले की, “नवाब मलिक यांनी त्यांच्या जन्माच्या प्रमाणपत्रासंदर्भात नुकत्याच केलेल्या ट्विटबद्दल मला कळले. माझ्या जन्म प्रमाणपत्राचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. तरीही हे सर्व इथं एकत्र करण्याचा घाणेरडा प्रयत्न आहे. माझी आई मुस्लिम होती म्हणून त्यांना माझ्या मृत आईला या सगळ्यात आणायचे आहे का? माझी जात आणि कौटुंबिक पार्श्वभूमी पडताळून पाहण्यासाठी ते, तुम्ही किंवा कोणीही माझ्या जन्मगावी जाऊन माझ्या पणजोबांकडून माझ्या वंशाची पडताळणी करू शकतात, पण त्यांनी अशी घाण पसरवू नये. मी हे सर्व कायदेशीररित्या लढेन आणि न्यायालयाबाहेर यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही,” असं त्यांनी सुत्रांशी बोलताना म्हटल्याचं एनडीटीव्हीने म्हटलंय.