नवाब मलिक यांनी गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये मुंबई एनसीबी आणि विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांवर देखील थेट अंडरवर्ल्डशी लागेबांधे असल्याचे आरोप करून खंडणी वसुलीचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी मलिक यांनी समीर वानखेडे आणि एका ड्रग्ज प्रकरणातील पंच यांच्यातल्या कथित संभाषणाची एक ऑडिओ क्लिप ऐकवून दाखवली आहे. यामधील संभाषणावरून त्यांनी एनसीबीच्या डीजींनाच जाब विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॅकडेटेड पंचनाम्यांचा घोटाळा

नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर बॅकडेटेड पंचनाम्यांवर पंचांच्या सह्या घेत असल्याचा आरोप केला आहे. “२०२१मध्ये एनसीबी मुंबईचा फर्जीवाडा उघड करण्याचं आम्ही काम केलं, अधिकारी खोटी प्रकरणं बनवत होते. प्रसिद्धीसाठी लोकांना बोलवलं जायचं. खंडणीचा खेळ शहरात सुरू होता. २ ऑक्टोबरच्या क्रूज छाप्यानंतर केपी गोसावी, मनीष भानुशाली यांच्या प्रकरणात बनाव केला गेला. २५ कोटींची डील झाली. आम्ही सगळे पुरावे लोकांसमोर ठेवले. एनसीबीनं बचाव केला, मग एनसीबीअंतर्गतच एसआयटी बनवली. पण तरी एनसीबीचा फर्जीवाडा थांबायचं नाव घेत नाही”, असं नवाब मलिक म्हणाले.

“अधिकाऱ्यांनी बोगस केसेस बनवल्या. पंचांकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. खोट्या प्रकरणांत लोकांना अडकवलं. आता त्याच खोट्या प्रकरणांना सुधारण्यासाठी पंचांना कशा प्रकारे फोन करून बोलवलं जातंय, आधीच्या तारखेचा पंचनामा सुधारा असं सांगितलं जातंय, याच्या दोन ऑडिओ क्लिप आहेत”, असं नवाब मलिक म्हणाले.

“भाजपाचे बडे नेते समीर वानखेडेंसाठी दिल्लीत लॉबिंग करतायत”, नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप!

काय आहे त्या ऑडिओ क्लिप्समध्ये?

यावेळी मलिक यांनी त्या दोन्ही ऑडिओ क्लिप पत्रकारांना ऐकवून दाखवल्या. या क्लिपमध्ये किरण बाबू नावाचा एनसीबी अधिकारी मॅडी नावाच्या पंचाला बॅकडेटेड पंचनाम्यावर सही करण्यासाठी कार्यालयाच्या बाहेर कुठेतरी येण्यासाठी सांगत असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं. याशिवाय, दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये मॅडीनं समीर वानखेडे यांनाच फोन लावून किरण बाबूने बोलावलं आहे, जाऊ का? अशी विचारणा केली, आणि समीर वानखेडेंनी त्याला जायला सांगितलं, असं संभाषण आहे. या संभाषणात समीर वानखेडे, किरण बाबू आणि मॅडी अशा व्यक्ती असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

एसआयटीचं काय झालं?

“एनसीबीचा फर्जीवाडा अजूनही बंद होत नाहीये. गेल्या वर्षभरात अशा केसेस दाखल करून हजारो कोटींची वसुली केली गेली. हवाल्याचे सगळे पुरावे आम्ही दिले. एनसीबीनं सांगितलं व्हिजिलन्स तपास होणार. त्याचं काय झालं? एसआयटीचं काय झालं. वसुलीच्या या खेळात सगळेच सामील आहेत का?” असा सवाल नवाब मलिक यांनी केला. “हा प्रकार पंचनामा बदलायचा आहे. आमचा सवाल आहे की एनसीबीचे डीजी यावर बाबू, समीर वानखेडेंवर काय कारवाई करणार? एका स्मगलरच्या माध्यमातून लाखो रुपये पीआर एजन्सीवर खर्च करून बातम्या प्लांट केल्या जात आहेत”, असं नवाब मलिक म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp nawab malik targets ncb sameer wankhede releases audio clip kiran babu madi pmw
First published on: 02-01-2022 at 13:15 IST