“होय मी भंगारवाला आहे, पण माझ्या वडिलांनी कधीही…,”; १०० कोटींच्या खटल्यावर नवाब मलिकांनी दिलं उत्तर

क्रूझ ड्रग्ज पार्टीवर करण्यात आलेल्या कारवाईवरुन नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले

NCP, Nawab Malik,
क्रूझ ड्रग्ज पार्टीवर करण्यात आलेल्या कारवाईवरुन नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले

होय मी भंगारवाला आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आपल्यावर दाखल १०० कोटींच्या खटल्यावर उत्तर दिलं आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीवर करण्यात आलेल्या कारवाईवरुन नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी चित्रपटाचा इंटरवल झाला असून समीर वानखेडे यांची नोकरी जात नाही आणि त्यांनी तुरुंगात टाकत नाही तोपर्यंत शेवट होणार नाही असंही म्हटलं. या राज्यात निरपराध लोक बाहेर येत नाहीत, यांची सगळी प्रकरणं बोगस असल्याचं सिद्ध करत नाही तोवर चित्रपट संपणार नाही असंही ते म्हणालेत.

हिवाळी अधिवेशन गाजणार, अधिवेशनानंतर भाजपाच्या नेत्यांना…; नवाब मलिकांचा इशारा

भाजपा नेते मोहित कम्बोज १०० कोटींचा खटला दाखल करणार असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “माझी तर औकाद इतकी आहेच नाही. माझा ब्रॅण्ड त्यांनी १०० कोटींचा केला आहे. सगळं विकलं तरी माझ्याकडे १०० कोटी नाहीत. ते सांगतात भंगारवाले…पण भंगारवाला काय असतो. होय मी भंगारवाला आहे. माझे वडील कपडे आणि भंगारचा व्यवसाय केला. वयाच्या १६ व्या वर्षापासून ते राजकारणात आमदार होण्यापर्यंत मी भंगारचा व्यवसाय करत होतो. शेजारीच आमचं दुकान आहे, जाताना त्याचे फोटोही काढा. माझे कुटुंब भंगारचा व्यवसाय करतं याचा अभिमान आहे”.

“माझ्या आजोबांनी कधीही बनारसमध्ये कोणत्या डाकूंकडून सोनं घेतलेलं नाही. माझ्या वडिलांनी चोरांकडन सोनं खरेदी केलं नाही. मी कधीही मुंबईत सोन्याची तस्करी केली नाही. मी कोणतं मार्केट बुडवलं नाही. कोणत्याही बँकांचे पैसे खाल्ले नाहीत. मी कंपन्या निर्माण करुन बँकांचे शेकडो कोटी बुडवले नाहीत. माझ्या घरी कधी सीबीआयीने धाड टाकलेली नाही. माझ्यावर कोणताही आरोप नाही. मुख्यमंत्री निधीत तो चेक बाऊन्स मी केला नाही,” असा टोला यावेळी नवाब मलिक यांनी लगावला.

“होय मी भंगारवाला आहे. भंगारवाल्याची किमयागिरी काय असते हे या लोकांना माहिती नाही. जी वस्तू उपयोगी नसते ती उचलून आणतो. त्याचे तुकडे करुन पाणी पाणी करण्याचं काम भंगारवाला करतो. नवाब मलिक या शहरात जेवढे भंगार आहेत, त्यांचे एकएक नट बोल्ट काढून भट्टीत टाकणार आहे आणि यांचं पाणी केल्याशिवाय थांबणार नाही,” अशा इशाराही नवाब मलिक यांनी यावेळी दिला.

Drugs Case : बॉलिवूड मुंबईतून युपीला नेण्याचं भाजपाचं षडयंत्र, नवाब मलिकांचा थेट आरोप

किरण गोसावी सगळी पोलखोल करु शकतो –

“मी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे तपासाची मागणी केली होती. एक समिती याचा तपास करणार आहे. गेल्या नऊ-साडे नऊ महिन्यात जी माहिती एकत्र केली आहे त्यात कोणत्याही सरकारी यंत्रणेची मदत घेतलेली नाही. माझ्या माहितीतील लोकांकडून माहिती गोळा केली. फ्लेचर पटेल हा फ्रॉड आहे. समीर वानखेडे आणि त्याचे संबंध ११-१२ वर्ष जुने आहेत. फ्लेचर पटेलसोबत आदिल उस्मानी नावाची एक व्यक्ती आहे. जो आयात-निर्याचं काम करतो. अनेक प्रकरणात तो पंच का झाला हादेखील प्रश्न आहे. त्याबद्दलही आम्ही माहिती मिळवत आहोत,” असंही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं. अटक करण्यात आलेला किरण गोसावीच सगळा पोलखोल करेल असंही ते म्हणाले आहेत.

चित्रपटाचा इंटरवल झाला आहे –

“आरोपींना पकडून घेऊन जो आतमध्ये जात होता त्यालाच अटक झाली आहे. जी लोकं कालपर्यंत यांना जामीन होऊ नये या भूमिकेत होते, आता त्यांच्यावरच अटकेची टांगती तलावर आहे. काल इंटरवल झाला असून आता नवीन परिस्थिती निर्माण झाली आहे. संजय राऊतांनीही इंटरवलपर्यंत नवाब मलिक आणि पुढे मी पिक्चर चालवणार असं सांगितलं आहे. आता सलीम जावेदसारखं आम्हाला मिळून चालवावा लागेल,” असं नवाब मलिक म्हणाले.

गोसावी आणि भाजपाचे एक नेते यांची पार्टनरशिप

“गोसावी आणि भाजपाचे एक नेते यांची पार्टनरशिप आहे. त्यांची बायको एका कंपनीत पार्टनर आहे. विधानसभेत हे सर्व सांगू. जो बोगस, फर्जी माणूस त्यांची नोकरी जाणे, तुरुंगात टाकणे तसंच या राज्यातील निरपराध लोक बाहेर येत नाहीत, सगळी प्रकऱणं बोगस असल्याचं सिद्ध करत नाही तोवर पिक्चर संपणार नाही,” असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. पोपटाला वाचवण्यासाठी सगळे लोक पुढे पुढे पळत आहेत. विधानसभेत परिस्थिती समोर आल्यानतंर यांना महाराष्ट्रात तोंड दाखवण्याची स्थिती उभी राहणार नाही असं सांगत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

भाजपा नेते मोहित कम्बोज यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांच्या सांगण्यावरून प्रभाकर साईल समीर वानखेडेंवर आरोप करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp nawab malilk bhangarwala mumbai drugs case aryan khan ncb sameer wankhede sgy

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या