डान्सबार पुन्हा सुरू होण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून, त्याचे पडसाद बुधवारपासून सुरू होत असलेल्या राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटणार आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी मुंबईमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीकडून डान्सबार बंदीचा विषय लावून धरण्यात आला, तर काँग्रेसने दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारणार असल्याचे सांगितले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, राज्यातील सामान्य माणसामध्ये डान्सबार पुन्हा सुरू होण्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या १५ तारखेच्या आत सरकारने डान्सबार बंदीसाठी आवश्यक विधेयक दोन्ही सभागृहात ठेवावे. दोन्ही सभागृहात सर्वजण एकमताने हे विधेयक मंजूर करतील. राज्यात कोणत्याही स्थितीत डान्सबार पुन्हा सुरू होऊ दिले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळाच्या मुद्द्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, राज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक भाग दुष्काळाच्या खाईत लोटला गेला आहे. पण दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी ज्या तातडीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत, त्याबद्दल सरकार स्तरावर उदासीनता असल्याचे दिसते. यामुळे सरकारचा निषेध करावा तितका थोडा आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी मागणी त्यांनी केली.