मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सत्तासंघर्ष सुरू असतानाच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाल्याचे विधान केल्यानंतर राज्यात मोठा वादंग झाला. अखेर गोयल यांनी चुकीच्या माहितीवर भाष्य केल्याचे सांगत खेद व्यक्त केला, तर प्रफुल्ल पटेल यांनीही निवड झाली नसल्याचे सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी प्रफुल्ल पटेल इच्छुक असल्याची चर्चा सुरू असतानाच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्याचे सांगितले. गोयल यांची मुलाखत प्रसिद्ध होताच राज्यभरात वादंग झाला. त्यामुळे तातडीने प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची राष्ट्रीय अध्यक्ष पटेल यांची निवड झाली नसल्याचे जाहीर केले.
वाद वाढत असतानाच गोयल यांनी मला एका वरिष्ठ पत्रकाराने चुकीची माहिती दिली. मीही माहिती खातरजमा न करता बोलून गेलो. चुकीच्या माहितीबद्दल खेद व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे, असा खुलासा केला.
प्रफुल्ल पटेल यांनीही, माध्यमांच्या माध्यमातून माझी पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती दिली जात आहे. मात्र, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनेचे पालन करून अध्यक्षपदाची निवडीची प्रक्रिया राबवू, असे म्हटले आहे.
दादांची शपथ घेऊन सांगतो, विलिनीकरणाची चर्चा झाली…
मी दिवंगत अजित पवार यांची शपथ घेऊन सांगतो की, अजित पवार यांच्यासोबत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. फक्त आम्हालाच गरज आहे, असे नाही. अजित पवार यांची स्वःताची इच्छाही विलिनीकरणाची होती.
एकदा नाही दहा- बारा वेळा विलिनीकरणाची चर्चा झाली आहे. विलिनीकरण निश्चित झाल्यामुळेच आम्ही महापालिका निवडणुका एकत्र लढलो. महापालिका निकालानंतर आम्ही लगेच एकत्र येणार होतो. पण, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यामुळे विलिनीकरण मागे पडले. अजित पवार यांची इच्छा पूर्ण करायची की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे, असेही शिंदे म्हणाले.
गौतम अदानींनी घेतली शरद पवार यांची भेट
अजित पवार यांच्या निधनानंतर सत्तासंघर्ष सुरू असतानाच रविवारी सायंकाळी उद्योगपती गौतम अदानी यांनी मुंबईतील सिव्हर ओक, या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भेटीचा अधिक तपशील कळला नाही. पण, राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
सुनेत्रा पवारच सर्वेसर्वा – कोकाटे
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात रविवारी अजित पवाराच्या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षाच्या सर्वेसर्वा आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, विधीमंडळ पक्षाच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही सर्वांचे त्यांनाच समर्थन आहे. त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका मांडली. आमदार सुनिल शेळके यांनीही कोकाटे यांच्या विधानाला दुजोरा दिला.

