पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ करण्यात आलीय. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे ३५ पैशांनी वाढ केलीय. या दरवाढीबरोबरच ऑक्टोबर महिन्यातील एकूण इंधन दरवाढ ही साडेचार रुपये प्रती लिटरपर्यंत पोहचली आहे. आजची दरवाढ ही या महिन्यातील १५ वी दरवाढ ठरलीय. याच इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पेट्रोल पंपांसमोर आंदोलन करण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडून मुंबईतील अनेक पेट्रोल पंपांसमोर आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये पेट्रोल पंपांवर मोदींचे बॅनर्स झळकावण्यात आले. या पोस्टरवर मोदी मुंबईतील पेट्रोलपंपावर लावलेल्या मोदींच्या बॅनर्सवर मोदी हाताने प्रश्नार्थक इशारा करताना दिसत आहेत. बॅनरर्सवर ‘बघतोय काय रागानं… पेट्रोलनंतर डिझेलचं सुद्धा शतक करुन दाखवलंय वाघानं’, असं लिहिण्यात आलं आहे. आंदोलकांनी पेट्रोल पंपासमोर केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही केली.

दरम्यान, इंडियन ऑइल कॉर्परेशन लिमिटेडने आज म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या नवीन दरांनुसार दिल्लीमध्ये इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल १०६.१९ रुपये लिटर तर डिझेल ९४.९२ रुपये लिटरपर्यंत पोहचलं आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर लिटरमागे ११२.११ रुपये तर डिझेलचे दर १०२.८९ रुपयांवर पोहचलेत.

ऑक्टोबरमध्ये १५ वेळा वाढले दर…
ऑक्टोबर महिन्यामध्ये आतापर्यंत १५ वेळा इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत. मागील तीन दिवस आणि इतर दोन दिवस वगळल्यास रोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये पेट्रोल ४.४५ रुपयांनी महाग झालं आहे तर डिझेल पाच रुपयांनी महागलं आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवरही होताना दिसतोय.

या राज्यांमध्ये पेट्रोल शंभरीपार…
मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, दिल्ली, ओदिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. मेट्रो शहरांपैकी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. केंद्र सरकार आकारत असणाऱ्या करांबरोबर प्रत्येक राज्यामध्ये राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या कराची टक्केवारी वेगळी असल्याने वेगवेगळ्या राज्यांमधील दर वेगवेगळे असतात.

चार मुख्य शहरांमधील पेट्रोल डिझेलचे प्रति लिटर दर खालीलप्रमाणे : –
दिल्ली – पेट्रोल १०६.१९ रुपये प्रति लिटर, डिझेल ९४.९२ रुपये प्रति लिटर
मुंबई – पेट्रोल ११२.११ रुपये प्रति लिटर, डिझेल १०२.८९ रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल १०३.३१ रुपये प्रति लिटर, डिझेल ९९.२६ रुपये प्रति लिटर
कोलकत्ता – पेट्रोल १०६.७७ रुपये प्रति लिटर, डिझेल ९८.०३ रुपये प्रति लिटर

जाणून घ्या तुमच्या शहरामधील दर
देशामधील तिन्ही तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी रोज सकाळी सहा वाजता इंधनाच्या नवीन दरांची घोषणा करतात. या नव्या दरांची माहिती त्यांच्या वेबसाईटवर मिळते. तर दुसरीकडे फोनवरही एसएमएस करुन नवीन दर तपासण्याची सुविधा देण्यात आलीय. 92249 92249 क्रमांकावर एसएमएस पाठवून पेट्रोल डिझेलच्या नवीन दरांबद्दल माहिती मिळवता येते. RSP < स्पेस > पेट्रोल पंप डिलरचा कोड लिहून 92249 92249 वर पाठवावा.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp protest against petrol diesel price hike in mumbai put pm modi banner scsg
First published on: 20-10-2021 at 13:50 IST