मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमुळे (अजित पवार गट) महायुतीला राज्यात मोठा पराभव पत्कारावा लागला, हे रा.स्व. संघाशी संबंधित ‘ऑर्गनायझर’मधील लेखाशी राष्ट्रवादी पक्ष सहमत नसून भाजपचे नेतृत्वसुद्धा या लेखातील भूमिकेशी सहमत असणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी अजित पवार गटाने मांडली. तसेच भाजपचा विरोध असला तरी मुस्लीम आरक्षणाचा अजित पवार गटाने पुरस्कार केला आहे.

हेही वाचा >>> स्वतःला निरक्षर घोषित केलेल्या १२१ उमेदवारांचा लोकसभा निवडणुकीत पराभव, काय आहे अहवाल?

मुख्य प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की, अपशय आल्यानंतर अनेक कारणे शोधली जातात. आरोप-प्रत्योराप होत असतात. ऑर्गनायझरमध्ये आलेल्या लेखाशी भाजपचे नेतृत्व सहमती दाखवणार नाही. पराभवाचा ठपका राष्ट्रवादीवर ठेवता येणार नाही. आमची महायुती ही दिर्घकाळाची आहे. त्यामुळे अजित पवार हे भाजपबरोबर यापुढेही असतील. आता आमचे लक्ष विधानसभा निवडणूक आहे. महायुतीमध्ये कोणताही वाद नाही, मतभेद नाही. झालेल्या चुका विधानसभा निवडणुकीत सुधारल्या जातील. मतभेदाचे निराकरण केले जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांचा राज्यव्यापी दौरा

राष्ट्रवादीसंदर्भात संभ्रम पसरवला जातो आहे. मी दिल्लीत होतो, मात्र आमच्यामुळे महायुतीचा पराभव झाला, असे भाजपचे कोणी म्हणाले नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर अजित पवार राज्यव्यापी दौरा करणार आहेत. यावेळी काहींना सहानुभूती मिळाली पण, ती अधिक काळ राहात नसते, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.