राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी जाहीर केली असून विरोध करणार असल्याचं म्हटलं आहे. “अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही,” अशा शब्दांमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय आहे.

लोकसत्ता विश्लेषण: राष्ट्रवादीत वादावादीस कारणीभूत ठरलेलं नथुराम गोडसे प्रकरण आहे तरी काय?

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे
pankaja munde manoj jarange
“मला खात्री आहे, ती माणसं…”, प्रचारावेळी राडा करणाऱ्यांबाबत पंकजा मुंडेंचं वक्तव्य; मनोज जरांगेंचा उल्लेख करत म्हणाल्या…

“विनय आपटे, शरद पोंक्षे यांना या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेने प्रचंड विरोध केला त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार,” असंही आव्हाड यांनी सांगितलं आहे. “कलाकार आणि माणूस दोन वेगळ्या भूमिका नाहीत. पण जेव्हा गांधी साकारता भूमिका बदलत नाही कारण ती वैचारिक भूमिका आहे. नथुराम महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. कलाकार म्हणून अमोल कोल्हे महान आहेत, पण त्यांनी केलेल्या अभियानाचा विरोध आहे,” असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसे भूमिकेवरील वादावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या या टीकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी अमोल कोल्हेंची पाठराखण केली. कलाकार म्हणून त्यांनी ती भूमिका केली असून त्याकडे त्याच दृष्टीने पहायला हवं असं शरद पवार म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी आव्हाडांच्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता ते त्यांचं मत असून त्यांनी मांडलं असल्याचं सांगत जास्त बोलणं टाळलं.

तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पहावं लागेल – शरद पवार

“महात्मा गांधींवरील सिनेमा संपूर्ण जगात गाजला होता. त्या चित्रपटातही कोणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका ज्याने केली तो कलाकार होता, तो काही नथुराम गोडसे नव्हता. कोणत्याही चित्रपटात कलाकार एखादी भूमिका करत असेल तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पहावं लागेल,” असं शरद पवार म्हणाले.

अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेवरुन सुरु असलेल्या वादावर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “अफझल खानाचीही…”

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारीत चित्रपटात एखाद्या अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका केली म्हणजे तो मुघल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. कलावंत म्हणून तो भूमिका घेतो. किंवा रामराज्यासंबंधी सिनेमा असेल तर त्यात राम आणि रावण यांच्यातील संघर्ष दाखवला असेल तर तर रावणाची भूमिका करणारी व्यक्ती रावण असू शकत नाही. एक कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे सीतेचं अपहरण केलं याचा अर्थ प्रत्यक्ष सीतेचं अपहरण त्या कलाकारने केलं असा होत नाही. रावणाचा इतिहास त्यातून दाखवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे अमोल कोल्हेंनी यासंबंधीची भूमिका घेतली असेल तर ती कलावंत म्हणून आहे”.

“अमोल कोल्हेंनी २०१७ मध्ये ही भूमिका केली तेव्हा ते आमच्या पक्षातही नव्हते. हा सिनेमा अजून बाहेरही आलेला नाही. पण कलावंत म्हणून त्यांनी ती भूमिका केली असेल तर याचा अर्थ गांधींजींच्या विरोधात काहीतरी आहे असा नाही. नथुराम गोडसेने जे काम केलं आहे त्यामुळे संपूर्ण देश अस्वस्थ, नाराज, दु:खी आहे. त्या नथुरामचं महत्व वाढवण्याचा यात कोणताही हेतू नाही. याकडे एक कलावंत म्हणून आणि या देशात घडलेला इतिहास समोर ठेवून पहायला पाहिजे,” असं शरद पवारांनी सांगितलं.

“भाजपा नेते गांधीवादी कधीपासून झाले”

भाजपा नेत्यांकडून होणाऱ्या टीकेसंबंधी बोलताना टोला लगावत ते म्हणाले की, “भाजपा नेते गांधीवादी कधीपासून झाले. भाजपा आणि आरएसएसच्या इतिहासावर मी भाष्य करु इच्छित नाही. पण एक काळ असा होता की गांधींच्या संबंधी वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या कुठे आहेत ते बघितलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी बोलावं”. आव्हाडांच्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी त्यांचं मत मांडलं असं शरद पवार म्हणाले. तसंच मी कोणत्याही कलावंताचा सन्मान करतो असंही म्हणाले.

अमोल कोल्हेंनी काय बाजू मांडली आहे?

“२०१७ साली या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. ज्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत,” असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?

अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते असे त्यांनी म्हटले आहे.