मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार) महाराष्ट्र प्रदेशच्या पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश होईपर्यंत सर्व प्रवक्त्यांना त्यांच्या पदावरून बरखास्त करण्यात आल्याचे आणि विद्या चव्हाण, महेश तपासे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी दिल्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे, ४ ऑगस्ट २०२६ पासून यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात येत असून, पुढील आदेश जारी होईपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे. दरम्यान, या कालावधीत पक्षाची अधिकृत भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडण्याची जबाबदारी माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
हे दोघेच पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून माध्यमांशी संवाद साधतील. त्यामुळे यापुढे विद्या चव्हाण आणि महेश तपासे यांच्याकडूनच पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार आहे. पक्षाने सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या एकाचवेळी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निर्णयामागील नेमके कारण आदेशात नमूद करण्यात आलेले नाही. आगामी काळात पक्षाच्या प्रसिद्धी विभागात व्यापक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
