मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आठ खासदार सोमवारी सकाळी अकरा वाजता संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम्ही पंतप्रधानांची वेळ घेतली आहे, अशी माहिती पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
सध्याच्या परकीय योगदान (एफसीआरए) सुधारणा विधेयकाला आमचा विरोध आहे, त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. हे विधेयक देशावर लादू नका, एक तर विधेयक मागे घ्या किंवा विधेयक संयुक्त समितीकडे पाठवावे, अशी आमची मागणी आहे. स्वयंसेवी संस्थांना मिळणाऱ्या परकीय मदतीबाबत हे विधेयक महत्त्वाचे आहे. डर्टी मनी असेल, अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी पैसा येत असेल तर तो जरूर थांबवा. पण, शिक्षण, आरोग्य, समाजकार्यासाठी येणारा निधी थांबवू नका, अशी मागणीही सुळे यांनी केली.
दिल्लीतील जंतर – मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या दरम्यान पॅलेट गनचा वापर कसा झाला. लाठीमार का झाला, आंदोलन कसे हातळले गेले, याचा तपास विशेष तपास पथकाडून करावा. सरसंघचालकांनी जेन – झी म्हणजेच नवी पिढी प्रामाणिक, देशभक्त असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. या पिढीला सीबीआय, ईडी किंवा अन्य कोणत्याही केंद्रीय यंत्रणांची भीती नाही. त्यामुळे आता ही तरुण पिढी लवकरच सरकार चले जावच्या घोषणा देईल, असेही सुळे म्हणाल्या.
शेतकरी कर्जमाफी बद्दल सरकार असंवेदनशील
राज्य सरकारचे सर्व काम, धोरणे निवडणूक धार्जिणे असते. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना कसले नियम, कायदे पाहता. गरीब शेतकऱ्यांना मदत करताना सरकार असंवेदनशील दिसत आहे. सत्तेवर आल्यावर मदत करताना हात आखडते घेतले जातात. पेपरफुटी होताना नियम, कायदे कुठे जातात. शेतकरी आणि लाडक्या बहिणींबाबत सरकार नियम, कायदे पुढे करते, या असंवेदनशीलतेचा आम्ही निषेध करतो, असेही सुळे यांनी म्हटले आहे.
शिवसेना – राष्ट्रवादीवर अन्याय
राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी कुणाकडे हा प्रश्नच येत नाही. संबंधित राजकीय पक्षाचे पदाधिकारी कुणाकडे हे महत्त्वाचे आहे. जसा शिवसेना हा पक्ष फक्त उद्धव ठाकरेंचा आहे, तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त शरद पवार यांचाच आहे, असा पुनरुच्चार सुळे यांनी केला. सुनेत्रा पवार यांच्या विषयी काँग्रेसने गुंगी गुडिया, अशी केलेली टीका अयोग्य होती. त्या बाबत मी काँग्रेस नेत्यांशी बोलल्यानंतर अर्ध्या तासात केंद्रीय नेत्यांनी संबंधित विधान मागे घेतले आहे. काँग्रेसच्या स्थानिक प्रसिद्धी विभागाने केलेली ही टीका आहे, असेही सुळे यांनी सांगितले.
