scorecardresearch

“आम्हाला धमकी देत होते…”; नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

ट्विटरच्या मागे लपून अनेक लोक सातत्याने अटक होणार आहे असे ट्विट करत असतात. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या

NCP Supriya Sule reaction to Nawab Malik ED inquiry
(संग्रहित छायचित्र)

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांची आज अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्यात येत आहे. सकाळी सहा वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले होते. तिथे त्यांची सुमारे तासभर चौकशी करण्यात आली. घरी चौकशी केल्यानंतर अधिकारी नवाब मलिक यांना सकाळी साडेसातच्या सुमारास ईडीचे अधिकारी कार्यालयात घेऊन गेले. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडी कार्यालयात त्यांची चौकशी सुरू आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. विरोधात असताना ईडीच्या नोटीस येतात आणि पक्ष बदलल्या नंतर ती नोटीस विरघळून जाते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

“नवाब मलिक हे मंत्रीमंडळातील सदस्य आहेत आणि त्यांना चौकशीसाठी आधी नोटीस पाठवण्यात आली नव्हती. त्यांच्या घरी ईडीचे पथक धडकल्यानंतर पूर्ण सहकार्य करण्याची तयारी नवाब मलिकांनी केली आहे. त्यामुळे मला त्यामध्ये काही आश्चर्य वाटत नाही. कारण ट्विटरच्या मागे लपून अनेक लोक सातत्याने अटक होणार आहे असे ट्विट करत असतात. गेले अनेक महिने देशामध्ये आणि राज्यात जो विरोधक आहे त्यांना धमक्या आलेल्या आहेत. विरोधात असताना ईडीच्या नोटीस येतात आणि पक्ष बदलल्या नंतर ती नोटीस विरघळून जाते,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“नवाब मलिक सातत्याने जे सत्य आहे ते बोलत आले आहेत. त्यामुळे कदाचित हे झालेले असेल. इतके महिने आम्हाला धमकी देत होते त्यामुळे मला यामध्ये काही आश्चर्य वाटत नाही. मला विश्वास आहे की नवाब मलिक जे काही खरे आहे ते सांगतील. कदाचित भाजपाचा ईडी चालवत असेल किंवा भाजपा अध्यक्ष आणि ईडीचे अध्यक्ष एकच असतील. माझा यासोबत काही संबंध येत नसल्याने मला यातील काही माहिती नाही,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

अंडरवर्ल्डशी कथित संबंध असलेल्या मालमत्तेप्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना समन्स बजावले होते. आता या प्रकरणी नवाब मलिकची चौकशी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते मलिक येथील ईडी कार्यालयात पोहोचले आणि ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ (पीएमएलए) अंतर्गत त्यांचा जबाब नोंदवत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ईडीने १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत छापे टाकले होते आणि अंडरवर्ल्डशी संबधत कथित बेकायदेशीर खरेदी आणि मालमत्तांची विक्री आणि हवाला व्यवहारांसंदर्भात नवीन गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर मलिकची चौकशी केली जात आहे. १९९३च्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसीना पारकर, सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट, भाऊ इक्बाल कासकर आणि छोटा शकीलच्या नातेवाईकासह १० ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. आधीच कारागृहात असलेल्या कासकरला गेल्या आठवड्यात ईडीने अटक केली होती. पारकर यांच्या मुलाचीही ईडीने चौकशी केली होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp supriya sule reaction to nawab malik ed inquiry abn

ताज्या बातम्या