वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सूचक विधान केले आहे. भाजपा या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सहावा उमदेवार शिवसेनेचा पण आहे आणि भाजपाचा देखील आहे. भाजपाचे सहावे उमेदवार हे राष्ट्रवादीचे यापूर्वीचे खासदार होते. साखर कारखानदारी आणि सहकाराचा त्यांना अभ्यास आहे. त्यामुळे भाजपाने राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील गडाला भगदाड पाडण्याचा कसोशीने प्रयत्न चालवलेला आहे. धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीमुळे  प्रत्यक्षात भाजपा-शिवसेनेतील ही लढत राष्ट्रवादी विरूद्ध भाजपा अशी झाली आहे.” असे निरीक्षण प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे.

तसेच, “राष्ट्रवादीला स्वत: चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार संजय पवार यांना निवडून आणावा लागेल. तो उमेदवार निवडून न आल्यास भाजपाने राष्ट्रवादीच्या गडात प्रवेश केला असं म्हटलं जाईल. राष्ट्रवादीला पूर्णपणे आव्हान देणं भाजपाला सोपं जाईल, केंद्राच्या हातात इथेनॉलचं लायसन्स आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या साखर कारखानदारांना इथेनॉलचं लालूच दाखवून ते त्यांना भाजपाकडे घेतील आणि राष्ट्रवादीला खिंडार पडू शकते.” असं ते म्हणाले आहेत.

याचबरोबर, “राज्यसभा निवडणुकीत आतापर्यंतचा सर्वात मोठा घोडेबाजार होणार असल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी यावेळी केला. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार आहे. आपल्या ऐकण्यात नसेल इतकी किंमत असेल, महाराष्ट्राची जनता हे पाहतेय.”, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.