देश आणि राज्य पातळीवर होणा-या आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे महिला उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित राष्ट्रवादी युवती मेळाव्यात ते बोलत होते. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर आर पाटील यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना आरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे विधीमंडळ आणि संसदेतही महिलांना आरक्षण मिळण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे, असं पवार म्हणाले. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तसा प्रस्ताव मांडला जाईल आणि त्यासाठी सर्व पक्षांची सहमती घेणार असल्याचं पवार पुढे म्हणाले. यासंदर्भात पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली असल्याचंही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, या मेळाव्यापूर्वा पवारांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बॉम्बे रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतू तपासणीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पवारांनी थेट कार्यक्रम स्थळ गाठले.