मुंबई : प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मुंबईच्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सकडून (एनसीपीए) ‘मेस्ट्रो फॉरेव्हर – ए ट्रिब्यूट टू झाकीर हुसैन’ या विशेष दोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात होते. यावेळी देशासह जगभरातील संगीत क्षेत्रातील ५० कलाकारांनी आपल्या कलेद्वारे उस्ताद झाकीर हुसेन यांना अनोखी आदरांजली अर्पण केली.
उस्ताद झाकीर हुसैन यांचे एनसीपीएशी विशेष नाते होते. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांनी एनसीपीए येथेच आपले वडील अल्लारखाँ आणि पंडित रविशंकर यांच्यासह आपली कला सादर केली होती. नंतरही ते या संस्थेशी जोडलेले राहिले. यासाठीच एनसीपीएकडून या विशेष सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच व्याख्याने, संवाद, त्यांचा सांगीतिक प्रवास दाखवणारे छायाचित्र प्रदर्शन तसेच माहितीपटही रसिकांना दाखविण्यात आला.
उस्ताद झाकीर हुसेन यांनी भारतीय शास्त्रीय संगीतासह, पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत, रॉक, पॉप, जॅझ आणि विश्व संगीत अशा संगीतातील विविध प्रकारात योगदान दिले. हेच लक्षात घेऊन एनसीपीएने भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्ग्जांसह जगभरातील त्यांच्या सोबत काम केलेल्या कलाकारांना निमंत्रित करून अनोखी आदरांजली अर्पण करण्यात आली. पं. अजय चक्रवर्ती, अजय जोगळेकर, जॉन मॅक्लॉफ्लिन, उस्ताद अमजद अली खाँ, अमान अली बंगश व अयान अली बंगश, फजल कुरेशी, तौफिक कुरेशी, योगेश सम्सी, राकेश चौरासिया, शिखरनाद कुरेशी, नवीन शर्मा, जॉर्ज ब्रुक्स आणि पंजाब घराण्याचे शिष्यवृंद तसेच इतर कलाकार सहभागी झाले होते. यावेळी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या पत्नी अँटोनिया, कन्या अनिसा आणि इसाबेला आणि कुटुंबिय संगीत क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक प्रेक्षक उपस्थित होते.
जर मी झाकीर यांच्याविषयी बोलायला सुरुवात केली तर कुठे थांबायचे हे मला कळणारही नाही. असंख्य आठवणी आहेत आणि कृतज्ञताही. माझी आणि झाकीरची मैत्री १९६९ साली झाली आणि त्या क्षणापासून तो माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. मी आज जो काही आहे हे त्याच्याशिवाय शक्य नव्हते. त्याची प्रतिभा शब्दात मांडता येत नाही. उस्तादांचे वर्णनच करता येणार नाही कारण तो शब्दांच्या पलीकडे होता, अशी भावना गिटार वादक जॉन मॅक्लॉफ्लिन यांनी व्यक्त केली.
