मुंबई : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठी एनसीपीएतर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी एनसीपीए सिटी स्कॉलरशिप फॉर यंग म्युजिशियन्स २०२६-२८ साठी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संगीत क्षेत्रात आणखी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना या शिष्यवृत्तीअंतर्गत दोन वर्षासाठी दरमहा १० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

शिवाय भविष्यात त्यांना कला सादरीकरणासाठी संस्थेमार्फतच व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे.

एप्रिल २०२६ ते मार्च २०२८ या कालावधीत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. हिंदुस्थानी गायनातील ख्याल व धृपद या प्रकारांसाठी विशेष आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तसेच, बासरी, हार्मोनियम, व्हायोलिन, सितार, सरोद आदी वाद्यसंगीत देखील देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीच्या माजी लाभार्थ्यांना ‘एनसीपीए सिटी प्रिमिसिंग आर्टिस्ट सिरीज’ या व्यासपीठावर कला सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. शिष्यवृत्तीसाठी indianmusicscholarships@ncpamumbai.com या ई – मेलवर इच्छुकांनी माहिती पाठविणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्र. ९०८२६२००६५ यावर संपर्क साधावा.