राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांनी मुंबई साखळी बॉम्ब स्फोट १९९३च्या खटल्यामध्ये शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तची शिक्षा माफ करण्याला विरोध दर्शवला आहे. या खटल्यातील इतर गुन्हेगार देखील तशीच मागणी करतील म्हणून त्यांचा संजय दत्तच्या माफीला विरोध असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
“न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर संजय दत्त व इतर आरोपींना शिक्षा देण्यात आली आहे. संजय दत्तची शिक्षा माफ केल्यास न्यायालयीन प्रक्रियेला कोणताच अर्थ उरणार नाही. या खटल्यातील इतर गुन्हेगार देखील तशाच प्रकारची मागणी करण्याची शक्यता नाकारता येणार नाही,” असे जयंत पाटील म्हणाले.
“महाराष्ट्रसरकारच्या गृहमंत्रालयाने अध्याप त्याबद्दल अंतिम निर्णय घेणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. गृह मंत्रालयानेच संजय दत्तला कडक शिक्षा देण्याची मागणी केली होती,” असे पाटील म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र भाजपने देखील संजय दत्तच्या शिक्षा माफीबद्दल कोणते पाऊल उचलल्यास त्याला कडाडून विरोध करणार अलल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारने संजय दत्तच्या शिक्षेच्या माफीबद्दल कोणता निर्णय घेतल्यास दहशतवाद्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असे महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे शुक्रवारी नागपूरमध्ये म्हणाले.
संजय दत्तला सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले असल्यामुळे त्याच्या शिक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची सहानुभूती अपेक्षीत नसल्याचे तावडे म्हणाले.
“विरोधी पक्ष राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर.आर पाटील यांना मुंबईमध्ये भेटून सरकारने संजय दत्तच्या माफीअर्जावर कोणताही विचार करू नये अशी मागणी करणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संजय दत्तच्या दयेच्या अर्जावर महाराष्ट्र सरकारचे मत मागवले आहे,” असे तावडे यांनी सांगितले.