मुंबई : केंद्रीय गृह खात्याच्या अंतर्गत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या मदतीच्या निकषांमध्ये वाढ केली आहे. नव्या निकषांनुसार खरीप, जिरायती शेती, बागायती शेती, फळबागा, पशुधन, कुक्कुटपालन तसेच घरांच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या आर्थिक मदतीत चांगली वाढ करण्यात आली आहे. अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पूर्वीच्या तुलनेत अधिकची मदत मिळणार आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना या वाढीव निकषांचा दिलासा मिळणार आहे का ? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.

नव्या प्रस्तावित निकषांनुसार जिरायती, खरीप शेतीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ११ हजार रुपये, बागायती शेतीसाठी २२ हजार रुपये, तर फळबागांच्या नुकसानीसाठी ३० हजार रुपये मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. गाय, म्हैस, घोडा आणि उंट सारख्या मोठ्या जनावरांसाठी ५० हजार रुपये, शेळी, मेंढी आणि डुक्कर या सारख्या लहान जनावरांसाठी ५,१०० रुपये, गाढव आणि खेचर या सारख्या ओझी वाहणाऱ्या प्राण्यांसाठी २५,४०० रुपये, तर कोंबडीच्या नुकसानीसाठी प्रति कोंबडी १३० रुपये (कमाल १०० कोंबड्यांपर्यंत) मदतीची तरतूद करण्यात आली आहे.

नैसर्गित आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या मदतीतही वाढ करण्यात आली आहे. ही मदत पूर्वीच्या चार लाख रुपयांवरून आठ लाख रुपये करण्यात आली आहे. या शिवाय बचाव कार्य सुरू असताना झालेले मृत्यू मदतीसाठी पात्र ठरणार आहेत.

१ एप्रिल २०२६ पासून अंमलबजावणी ?

एनडीआरएफच्या मदतीचे नवीन निकष आर्थिक वर्षे २०२६ – २७ ते २०३० – ३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहेत. हे निकष २०२६-२७ या आर्थिक वर्षांपासून लागू होण्याची तरतूद असल्याने राज्यात १ एप्रिल २०२६ नंतर झालेल्या नुकसानासाठीही हे नवे दर लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळाच्या मदतीत वाढ होणार का, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे. तसे झाले तर दुष्काळी मदतीसाठी केंद्र सरकारला नव्याने सुधारित प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने वाढविलेल्या मदत निकषांना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी द्यावी लागणार आहे. त्यानंतरच अंमलबजावणी करता येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

केंद्र सरकारने एनडीआरएफच्या निकषांत वाढ करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. हवामान बदलामुळे वाढलेल्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे, असे मत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी व्यक्त केले आहे.

एनडीआरएफच्या मदतीचे सुधारित निकष

शेतीचा प्रकार – जुने दर – नवे दर (रुपयांत, प्रति हेक्टर)

जिरायत शेती – ८,५०० – ११,०००

बागायती शेती – १७,००० – २२,०००

फळबागा – २२,५०० – ३०,०००

मोठी जनावरे (गाई, म्हशी, घोडा, उंट) – ४०,००० – ५०,०००

लहान जनावरे (शेळी, मेंढी, डुक्कर) – ४,००० – ५,१००

ओझी वाहणारे प्राणी (गाढव, खेचर) – २०,००० – २५,४००

मृत व्यक्ती – ४ लाख – ८ लाख

प्रति कोंबडी – १०० – १३० (१०० कोंबड्यांपर्यंत)

घर पूर्णतः पडझड – १ लाख २५ हजार – १ लाख ६० हजार

दुर्गम भागातील घरे – १.३० लाख – १ लाख ७०

घर पडझड तात्पुरती मदत – ५००० – ८५००