मुंबई : मान आखडल्यावर किंवा दुखत असल्यावर अनेकजण तिला झटका देतात. मात्र मानेला झटका देणे जीवघेणे ठरू शकते हे नुकत्याच घडलेल्या दोन प्रकरणावरून उघडकीस आले. अप्रशिक्षित व्यक्तीने दाेघांच्या मानेला झटका दिल्यामुळे त्यांना पक्षाघाताचा झटका आला असून त्यांना कल्याण येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील न्यूरो, स्पाइन आणि स्ट्रोक इंटरव्हेन्शन तज्ज्ञ डॉ. ऋषभ छेडा यांच्या नेतृत्वाखालील विविध वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने दोन्ही रुग्णांवर तातडीने उपचार केले.
पहिल्या प्रकरणात, ३० वर्षीय महिलेला महिनाभरापासून मानेचा त्रास होत होता. त्यावर उपचार म्हणून तिने मानेला झटका देण्याची प्रक्रिया करून घेतली. त्यानंतर सुमारे १२ तासांनी तिला अचानक चक्कर येणे, शरीराचा तोल जाणे, काही काळासाठी शुद्ध हरपणे आणि चेहरा वाकडा होणे अशी लक्षणे दिसू लागली. मेंदूचे आणि रक्तवाहिन्यांचे स्कॅन केल्यानंतर मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा असल्याचे स्पष्ट झाले. तिला विशेष वैद्यकीय उपचार आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंध करणारी औषधे देण्यात आली. त्यानंतर तिची प्रकृती हळूहळू सुधारली आणि सहा आठवड्यांत रक्तप्रवाह पूर्ववत झाला.
दुसऱ्या प्रकरणात, २७ वर्षीय पुरुषाने मानेतील आखडलेपणा आणि वेदनांसाठी स्थानिक उपचार करणाऱ्या व्यक्तीकडून उपचार घेतले. त्यानंतर लवकरच त्याला तीव्र चक्कर येणे, चालताना तोल जाणे आणि हाताला मुंग्या येणे अशी लक्षणे जाणवली. वैद्यकीय तपासणीत मेंदू आणि हाताकडे रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्यांमुळे अडथळे निर्माण झाल्याचे आढळले. वेळेत उपचार आणि वैद्यकीय देखरेख मिळाल्यामुळे त्याची लक्षणे कमी झाली आणि रक्तप्रवाहात लक्षणीय सुधारणा झाली.
या दोन्ही प्रकरणांमधून जोर लावून मानेला झटका देण्याच्या संभाव्य धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज अधोरेखित होते. मानेचा त्रास सतत होत असल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मानेला झटका दिल्यानंतर पक्षाघाताची लक्षणे दिसलेल्या या दोन्ही रुग्णांच्या प्रकरणांवरून मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना इजा होऊ शकते हे स्पष्ट झाले. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, ज्यामध्ये अर्धांगवायू, कायमस्वरूपी अपंगत्व किंवा मृत्यूचाही समावेश आहे.
मानेतील वेदना किंवा आखडलेपणाकडे दुर्लक्ष करू नये आणि अपात्र व्यक्तीकडून जोर लावून मान झटकून घेण्याचे उपचार टाळावेत. त्रासाचे मूळ कारण समजून योग्य उपचार मिळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, स्ट्रोकची लक्षणे लवकर ओळखून विलंब न करता स्ट्रोकवर तातडीने उपचार करण्याची सुविधा असलेल्या रुग्णालयामध्ये पोहोचणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे न्यूरो, स्पाइन आणि स्ट्रोक इंटरव्हेन्शन तज्ज्ञ डॉ. ऋषभ छेडा यांनी सांगितले.
पक्षाघाताचा झटका तरुण व वरकरणी पूर्णपणे निरोगी दिसणाऱ्या व्यक्तीलाही येऊ शकतो. उपचारासाठी लागणाऱ्या प्रत्येक मिनिटाचे महत्त्व असते. वेळेत उपचार मिळणे आणि कायमस्वरूपी अपंगत्व येणे यामध्ये काही मिनिटांचा फरकही महत्त्वाचा ठरू शकतो, असेही डॉ. ऋषभ छेडा यांनी सांगितले.
