२० वर्षांत ४८७ किमी लांबीच्या मेट्रो मार्गांची गरज

नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएने भविष्यात मुंबई आणि एमएमआरमधील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी २००८ ते २०२१ पर्यंतचा अभ्यास केला आहे.

‘एमएमआरडीए’च्या ‘सर्वंकष वाहतूक अभ्यास-२’मधील शिफारशी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) सार्वजनिक वाहतूकव्यवस्था बळकट करण्यासाठी पुढील २० वर्षांत (२०४१ पर्यंत) ४८७ किमी लांबीच्या मेट्रोचे, तर २३२ किमी लांबीच्या उपनगरीय रेल्वेचे जाळे विकसित करण्याची गरज असल्याची शिफारस ‘सर्वंकष वाहतूक अभ्यास २’मध्ये करण्यात आली आहे. मेट्रो आणि उपनगरीय रेल्वेसह ५३३ किमी लांबीच्या स्वतंत्र बसमार्गिका, १२६४ किमी लांबीचे रस्तेही विकसित करणे गरजेचे असल्याचे, या आराखड्यात म्हटले आहे.

नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएने भविष्यात मुंबई आणि एमएमआरमधील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी २००८ ते २०२१ पर्यंतचा अभ्यास केला आहे. सर्वंकष वाहतूक अभ्यास नावाने हा अभ्यास करत त्यानुसार कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याअंतर्गत ज्या शिफारशी करण्यात आल्या त्यांची अंमलबजावणी करून मेट्रो, सागरीसेतू आणि अन्य प्रकल्प मार्गी लावले आहेत. मात्र यानंतर ही मुंबई-एमएमआरमधील वाहतूकव्यवस्था बळकट झालेली नाही. लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने उपलब्ध खासगी, सार्वजनिक वाहतूकव्यवस्था अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे पुढील २० वर्षांतील सर्वंकष वाहतूक अभ्यासाची गरज भासली आणि त्यानुसार ‘एमएमआरडीए’ने २०२१ ते २०४१ पर्यंतचा सर्वंकष वाहतूक अभ्यास २ पूर्ण केला आहे. या अभ्यासाचे प्रकाशन गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

मागील काही वर्षांत एमएमआरमधील सार्वजनिक वाहतुकीच्या वापराचा टक्का ७८ टक्क्यांवरून ६५ टक्क्यांवर घसरल्याची बाब या अभ्यासातून उघडकीस आली आहे. खासगी दुचाकी-चार चाकी आणि टॅक्सी-रिक्षामध्ये वाढ झाली आहे. ही चिंतेची बाब असल्याचे म्हणत एमएमआरडीएने आता सार्वजनिक वाहतुकीचा घसरलेला टक्का वाढविण्यासाठी या अभ्यासातील शिफारशींची अंमलबजावणी करून सार्वजनिक वाहतुकीला बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासात अनेक महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या असून या शिफारसीचे कृती आराखड्यात रूपांतर करून वाहतूक सुविधा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत.

चार लाख कोटींची गरज

सर्वंकष वाहतूक अभ्यास २ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्याच्या माध्यमातून हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचे सूतोवाच प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी केले. यासाठी चार लाख कोटी रुपये निधीची गरज लागणार असून मुंबई महानगरपालिका, बेस्ट, रेल्वे, एमएसआरडीसी आणि अन्य सरकारी यंत्रणांच्या मदतीने हे प्रकल्प उभारले जातील, असे ते म्हणाले.

२० वर्षांतील गरज

४८७ किमी लांबीचे मेट्रो मार्ग

२३२ किमी लांबीचे उपनगरीय रेल्वे मार्ग

५३३ किमी लांबीचे बसमार्ग/बीआरटीएस

१२६४ किमी लांबीचे रस्ते (सध्याच्या रस्त्यांसह)

४ आंतरराजीय बस आगार

१३ अंतर्गत बस आगार

 ५ शहरांतर्गत रेल टर्मिनल

५ मोठी आणि १४ छोटी ट्रक टर्मिनल

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Need for 487 km of metro lines in 20 years akp

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या