रामचंद्र प्रतिष्ठान

मुंबई : स्पर्धा आणि समुपदेशनाच्या माध्यमातून तुरुंगातून बाहेर पडलेल्या कैद्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचे, त्यांच्यात आयुष्य सावरण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य दादर येथील ‘रामचंद्र प्रतिष्ठान’ गेल्या पाच वर्षांपासून करत आहे. कैद्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, त्यांचे शिक्षण, त्यांचा कौशल्य विकास याबरोबरच तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मुलांचे शिक्षण आणि पालनपोषणासाठी संस्थेला आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे.

तुरुंगातील जीवन नैराश्य निर्माण करणारे असते. कुटुंबाची काळजी, हातून घडलेल्या कृत्याचा पश्चात्ताप इत्यादी गोष्टींची गोळाबेरीज करताना कैद्यांच्या मनात अनेक बरे-वाईट विचार थैमान घालत असतात. त्यांची जगण्याची उमेद खालावलेली असते. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर समाज स्वीकारेल का, याची चिंता त्यांना अस्वस्थ करते. अशा कैद्यांना जुने सारे मागे सारून नवे आयुष्य सकारात्मकतेने सुरू करण्याचा दृष्टिकोन आणि मानसिक बळ रामचंद्र प्रतिष्ठान देत आहे. त्यासाठी वाचन, लेखन, निबंध स्पर्धा या माध्यमांतून त्यांच्यात विचारबीज रुजवले जात आहे.

वाचनाने परिवर्तन घडते, याचा वस्तुपाठ ‘रामचंद्र प्रतिष्ठान’ने घालून दिला आहे. क्रांतिकारक, समाजसुधारक आणि देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांची चरित्रे कैद्यांना वाचनासाठी दिली जातात. त्यामुळे जीवनातील अडचणी, नैराश्य यावर मात करून जगण्याची जिद्द कैद्यांमध्ये निर्माण होते. त्यांना नवा दृष्टिकोन आणि प्रेरणा मिळते. कैद्यांच्या निबंध स्पर्धा घेतल्या जातात. या माध्यमातून त्यांची मते, मनातील विचार मांडण्याचे व्यासपीठ त्यांना मिळते. तज्ज्ञांमार्फत त्यांचे समुपदेशनही  केले जाते.

‘‘ते कैदी असले तरी त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे. त्यांच्याकडे पाहण्याच्या समाजाच्या नजरा वेगळ्या असतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला असतो; परंतु त्यांच्यातील अंगभूत गुण, कला, कौशल्यांना वाव दिला तर तुरुंगाबाहेर आल्यानंतरही ते स्वाभिमानाने जगू शकतात. त्यांच्यात स्वाभिमान निर्मितीची प्रक्रिया घडवणे, हा रामचंद्र प्रतिष्ठानचा उद्देश आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण याची जबाबदारी संस्थेने घेतली आहे. आता या कामाला एका बंदिस्त छताखाली आणून पुनर्वसन केंद्र उभारण्याचा संस्थेचा मानस आहे,’’ असे ‘रामचंद्र प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी सांगितले.

एखादी व्यक्ती तुरुंगात गेल्यावर त्याच्या कुटुंबाची वाताहत होते. बऱ्याचदा त्यांच्या मुलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे कैदी तुरुंगात असताना त्यांच्या मुलांचे शारीरिक, मानसिक, वैचारिक आणि शैक्षणिक भरणपोषण करणे महत्त्वाचे आहे, त्या दृष्टीनेही संस्थेने काम सुरू केले असल्याने त्यासाठीही आर्थिक मदतीची गरज आहे.