मुंबई : पर्यावरण रक्षणासाठी प्रायोगिक प्रकल्पांची नव्हे, तर मोठय़ा प्रमाणात अंमलबजावणी करता येईल, सर्वत्र उपयुक्त ठरतील अशा उपाययोजनांची गरज असल्याचे प्रतिपादन  पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेतील परिसंवादात व्यक्त केली. दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत पर्यावरणाबाबत परिसंवाद झाला. त्यात ते बोलत होते. भारत हा मोठा खंडप्राय देश असून अनेक राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत. उद्या हवामान कसे राहील हे कोणीच सांगू शकत नाही इतके बदल गेल्या काही वर्षांत आम्ही अनुभवत आहोत. कमी वेळेत खूप जास्त पाऊस होत आहे. हिवाळय़ातही खूप थंडी पडत आहे. आता उन्हाळय़ातही तेच अनुभवत आहोत. एरवी या काळात मुंबईतील कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढत होते. ते यंदा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. मुंबई व लगतचा भारताचा पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश हा चक्रीवादळापासून तसा सुरक्षित असायचा. पण गेल्या दोन वर्षांत तीन वादळांचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसला. त्यामुळे वातावरणातील बदलाचे परिणाम भोगावे लागत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पण हे सारे का होत आहे याचा विचार होत नाही, असेही ते म्हणाले. पर्यावरण रक्षण हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला पुढील पिढय़ांसाठी चांगले पर्यावरण ठेवायचे तर पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारून पृथ्वीच्या कलाने घ्यावे लागेल.

पर्यावरण रक्षणासाठी अनेकदा विविध परिषदांमधून प्रायोगिक प्रकल्पांची चर्चा होते. पण त्याने पर्यावरण रक्षण होणार नाही. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात अंमलबजावणी करता येईल, कोणत्याही ठिकाणी उपयुक्त ठरतील, यशस्वी होतील अशा उपाययोजनांची गरज आहे, असा मुद्दा आदित्य ठाकरे यांनी मांडला. आपल्याकडे आता खूप वेळ आहे हे लक्षात घ्यायला हवे. आतापासूनच त्यादृष्टीने विविध उपाययोजना करायला हव्यात. त्याचाच भाग म्हणून आम्ही मुंबईत डिझेलवरील बसऐवजी विद्युत वाहनांना प्रोत्साहन देत आहोत. मुंबईतील बससेवा, राज्यातील एसटी बससेवा यासाठी विजेवर चालणाऱ्या बस घेत आहोत. त्याचबरोबर अभयारण्ये टिकवणे व नवी अभयारण्ये विकसित करण्याचे काम करत आहोत, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. आमच्याकडे विकास की पर्यावरण हा प्रश्न निर्माण होतो. त्यातून शाश्वत विकास या संकल्पनेवर आम्ही काम करत आहोत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.