प्रसाद रावकर
बॉम्बे फोर्टमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेपासून बोध घेऊन ब्रिटिशांनी मुंबई अग्निशमन दलाची मुहूर्तमेढ रोवली. काळ बदलत गेला आणि त्याबरोबर अग्निशमन दलही. अग्नितांडव असो वा इमारत कोसळून झालेली दुर्घटना, अग्निशमन दलातील जवान कायमच संकटमोचक बनून मुंबईकरांच्या मदतीला धावून येत आले आणि भविष्यातही येतील. अग्निशमन सेवा दिनानिमित्त अग्निशमन दलाच्या कारकीर्दीचा घेतलेला हा आढावा.
कोणे एकेकाळी सात बेटांमध्ये विखुरलेली मुंबई टुमदार कैलारू घरे, नारळी-पोफळीच्या बागांनी नटलेली होती. व्यापारउद्दीमाच्या निमित्ताने आलेल्या ब्रिटिशांनी भारतासह मुंबई काबीज केली. पोर्तुगिजांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या सात बेटांची मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला आंदण म्हणून मिळाली आणि बंदरासाठी नैसर्गिकदृष्टय़ा पोषक वातावरण असलेल्या मुंबईत औद्योगिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ब्रिटिशांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईतील डोंगरी आणि कुलाबा दरम्यान तटबंदी उभी केली आणि एक मोठा किल्ला आकाराला आला. बॉम्बे फोर्ट या नावाने तो ओळखला जाऊ लागला. अल्पावधीतच या किल्ल्याच्या आत आणि आसपासच्या भागात लोकवस्ती उभी राहिली आणि दाटीवाटी वाढली.
बॉम्बे फोर्टमध्ये १७ फेब्रुवारी १८०३ रोजी भीषण आग लागली आणि काही क्षणातच आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. बॉम्बे फोर्टमधील साधारण एकतृतीयांश भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. मोठी लोकवस्ती, गोदामे आणि लष्कराच्या दारूगोळय़ाचा साठा या आगीत बेचिराख झाला. मालमत्तेची प्रचंड हानी झाली. परिणामी, प्रगतीला खीळ बसली. या दुर्घटनेची कारणमीमांसा आणि किल्ल्याच्या पुनर्विकासासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने किल्ल्यामधील लोकवस्ती मर्यादित राहावी यासाठी काही सूचना केल्या. त्याचबरोबर अग्निशमन दलाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याची स्थापना करण्याचीही शिफारस केली.
भविष्यात अशा दुर्घटना घडल्यास मदतकार्य करता यावे यासाठी अग्निशमन दलाची स्थापना करण्यात आली. अग्निशमन दलात सुरुवातीला हातगाडीवरील हातपंपाच्या साह्याने अग्निशमनाचे काम करीत होती. त्यानंतर घोडागाडीचा वापर दलात वाढला. घोडागाडीवर वाफेवर चालणाऱ्या पंपांद्वारे अग्निशमनाचे काम सुरू झाले. दरम्यानच्या काळात मुंबईत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आणि अग्निशमन दल कात टाकू लागले. अग्निशमन दलात मोटारी आणि पंपाचा वापर सुरू झाला. दुर्घटना घडताच अग्निशमन दल संकटमोचक बनून मदतकार्यासाठी तत्परतेने धावू लागले. मुंबई कात टाकत होती. दुसऱ्या महायुद्धासाठी पाठविण्यात येणारा दारूगोळा, कापसाच्या गासडय़ा, तेलाची पिंपे, सोने आदी घेऊन आलेल्या एस.एस. फोर्ट स्टिकीन बोटीवर १४ एप्रिल १९४४ रोजी भीषण आग लागली.
दारूगोळय़ामुळे एकामागून एक स्फोट होतच होते आणि क्षणाक्षणात आग अक्राळविक्राळ रूप धारण करीत होती. व्हिक्टोरिया गोदीत अग्नितांडवच सुरू झाले. केवळ गोदीच नव्हे तर लगतच्या सुमारे एक ते दीड मैल परिसर आगीच्या कवेत आला. कानठळय़ा बसविणाऱ्या स्फोटांच्या आवाजाने नागरिकांचा थरकाप उडत होता. एकूणच गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली असतानाही अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. मदतकार्यासाठी कर्तव्यावर असलेल्या अग्निशमन दलातील ६६ अधिकारी आणि जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे केवळ अग्निशमन दलच नव्हे तर अवघी मुंबापुरी सुन्न झाली. अतुलनीय कार्य करणाऱ्या या अधिकारी-जनावांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून पाळण्यास सुरुवात झाली. यंदा यानिमित्त १४ ते २० एप्रिल या काळात अग्निशमन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रलयंकारी दुर्घटनेपासून बोध घेऊन अग्निशमन दल अधिक सक्षम करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात झाली. ब्रिटिशांच्या जोखडातून भारत स्वतंत्र झाला. मुंबई विस्तारत गेली. दाटीवाटीने दुमजली, तीन, चार, पाच मजली इमारती उभ्या राहू लागल्या. मोकळय़ा जागांवर झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या आणि अग्निशमन दलासमोर पुन्हा नवे आव्हान उभे राहू लागले. नवी आव्हाने पेलण्यासाठी दल सज्ज होऊ लागले. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून नवनवीन उपकरणे, वाहने अग्निशमन दलात दाखल होऊ लागली. इमारत कोसळणे, आग लागणे आदी दुर्घटनांमध्ये मदतकार्य करण्यासाठी अग्निशमन दल सक्षम बनले.
गेल्या पाच-सहा दशकांमध्ये मुंबईत पुनर्विकासाचे जोरदार वारे वाहू लागले. चाळींच्या जागेवर बहुमजली इमारती उभ्या राहू लागल्या. उंच इमारतींच्या वरच्या मजल्यावर लागलेली आग विझविण्याचे नवे आव्हान अग्निशमन दलासमोर उभे ठाकले. यावर मात करण्यासाठी अत्याधुनिक वाहने, उंच मजल्यावर पोहोचण्यासाठी मोठय़ा शिडय़ा आदी दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. त्याचबरोबर तोडगा म्हणून बहुमजली इमारतींमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा उभारणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, अग्निप्रतिबंधक यंत्रणेकडे रहिवासी दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच आगीची दुर्घटना झाल्यानंतर अग्निशमन दलाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून अग्निप्रतिबंधक यंत्रणा सक्षम असल्याची वेळोवेळी पडताळणी करणे गरजेचे आहे.
मुंबईतील आगीच्या दुर्घटनांचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासाअंती सर्वाधिक आगीच्या दुर्घटना सदोष विद्युत प्रणालीमुळे घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर स्वयंपाकाच्या गॅस सििलडरमधून होणाऱ्या वायू गळतीमुळे आगीच्या घटना घडत असल्याचाही निष्कर्ष काढण्यात आला आहे. टोलेजंग इमारती, वाहतूक कोंडी, अपुरे मनुष्यबळ असे एक ना अनेक प्रश्न अग्निशमन दलासमोर आहेत. तरीही अग्निशमन दल कशाचीही तमा न बाळगता संकटग्रस्त मुंबईकरांच्या मदतीला धाऊन जात आहे. त्यामुळे नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखायला हवी. आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मोलाचे आहे. आग लागूच नये यासाठी नागरिक दक्ष राहिले तर अनेक दुर्घटना टळू शकतील. अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने नागरिकांनी दक्ष राहण्याचा संकल्प सोडायला हवा. तरच दुर्घटना टळून मुंबईकर अधिक सुरक्षित बनतील.
prasadraokar@gmail. com