Criteria Behind Gorhe’s and Kadu Selection मुंबई: सतत तीन वेळा विधान परिषद आमदारकी आणि सात वर्ष उपसभापती पद भूषविलेल्या डॉ नीलम गोऱ्हे यांना पक्षातून विरोध असताना पुन्हा एकनाथ शिंदे यांनी का उमेदवारी दिली. बच्चू कडू यांची गरज शिंदे सेनेला का वाटली. या प्रश्नाची उत्तरे काय आहेत.
शिवसेना पक्ष फुटीनंतर काही महिन्यात उपसभापती पद असताना चार वेळा विधानपरिषद देणाऱ्या उध्दव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करुन एकनाथ शिंदे साथ देणाऱ्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा विधानपरिषद उमेदवारी देण्यात आली. मूळ शिवसैनिक असलेल्या बच्चू कडू यांनी चार वेळा अपक्ष म्हणून निवडून येऊन आपली क्षमता सिध्द केली आहे. अशा लढवय्या नेत्याला विर्दभात पक्ष वाढीसाठी विरोधकांच्या समोर बळ देण्यात आल्याने कडू यांनी शिवसेनेचा धनुष्य बाण हाती घेतला. परिषदेत ठाकरे यांच्या शिलेदारांच्या आरोपांवर ‘कडू’ नावाचे औषध शिंदे सेनेच्या कामी येणार आहे.
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी नऊ उमेदवारांनी अर्ज भरल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. शिवसेना शिंदे पक्षाने शेवटपर्यंत दोन उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत. दुपारी दीड वाजता एकनाथ शिंदे, उदय सामंत यांनी बच्चू कडू यांना घेऊन विधान भवनात प्रवेश केला. त्यापूर्वी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केल्याने कडू यांनी शिवसेनेचे भगवे उपरणे घातले होते. उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या दालनात या नेत्यांनी काही काळ चर्चा केली. त्यानंतर या दोन उमेदवारांनी शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले.
कडू यांना शिवसेनेची ताकद मिळाली आणि शिवसेनेला कडू याचे बळ मिळाले आहे असे शिंदे यांनी सांगितले. ज्यांचा आत्मा नाही, त्यांना आतला आवाज ऐकू येतो का? असा टोला त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या प्रश्नावर बोलताना मारला. रयतेचे राज्य पुन्हा निर्माण व्हावे यासाठी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केल्याचे कडू यांनी सांगितले. शेतकरी, दिव्यांग, वंचित यांच्या प्रश्न सोडविण्यावर भर देणार असल्याचे सांगताना कडू यांनी शिंदे यांना राज्याच्या सर्वाच्च गादीवर (मुख्यमंत्री पदावर) बसविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून शिंदे यांच्या स्वप्नांना बळ दिले.
शिंदे यांनी गोऱ्हे आणि कडू यांना उमेदवारी देऊन पक्षात एक संदेश दिला. गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात पक्षातून विरोध होता. चार वेळा विधान परिषदेच्या सदस्या राहिलेल्या गोऱ्हे यांना आता उमेदवारी देऊ नये असा मतप्रवाह होता. यात पक्षातील महिला जास्त आग्रही होत्या. त्यांच्या विरोधाला न जुमानता शिंदे यांनी पक्ष फुटीच्या काळात साथ देणाऱ्या गोऱ्हे यांच्या नावाला पसंती दिली. विर्दभात मित्रपक्षासह विरोधकांना पुरुन उरणाला लढवय्या नेता म्हणून कडू यांनी पक्ष प्रवेश करावा यासाठी आग्रह धरला गेला होता. कडू यांच्या सर्व मागण्यांना पक्षाची साथ मिळेल याची खात्री देण्यात आली. कडू यांच्या सारखा विर्दभातील मोहरा पक्षात घेण्यात शिंदे यांना यश आले आहे. हा मोहरा विधान परिषदेत ठाकरेच्या शिलेदरांना अंगावर घेण्यास कामी येईल असा अंदाज शिंदे यांनी बांधला आहे. गोऱ्हे यांची ‘शिंदे निष्ठा’ आणि कडू यांचा पक्ष वाढीसाठी होणारा वापर उमेदवारी मिळण्यात वरचढ ठरला आहे.
