मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विधान परिषदेतील भाषणादरम्यान टीका केल्यामुळे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना समाज माध्यमावर शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून ट्रोल केले जात आहे. पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी देखील गोऱ्हे यांच्यावर टीका केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी (अजित पवार) अमोल मिटकरी, राष्ट्रवादी (शरद पवार) शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे संदीप जोशी, दादाराव केजे, रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केणेकर यांना निवृत्त होणाऱ्या नऊ आमदारांना मंगळवारी विधान परिषदेत निरोप देण्यात आला. या निरोपाच्या भाषणात सर्वच सदस्यांनी एकमेकांना टोले लगावत एकमेकांची उणीदुणी काढली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना आपली खदखद बोलून दाखवली. मला खुप ट्रोलिंग होईल मला माहीत आहे, पण बोलणे गरजेचे आहे असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड टीका केली.

काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?

आपल्या भाषणाच्या वेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला बरं वाटलं, आम्ही धन्य झालो असं वाटलं. पण शेवटच्या एक वर्षात आमचा भ्रमनिरास झाला. हे वर्षभर कुणाला भेटत नव्हते. अधिकाऱ्यांशिवाय ते कुणालाच भेटत नव्हते.

तिथ गेलं की लक्षात यायचं की यांना आम्ही नको आहोत. आम्ही जेव्हा जेव्हा भेटायला जायचं तेव्हा आपण नकोसे आहोत अशी खात्री पटायची. माझी इच्छा आहे त्यांनी परत यावे आणि रोज रोज ऐकून ऐकून तरी त्यांनी माणसांना भेटावं, अशा शब्दात डॉ. गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. दरम्यान, डॉ. गोऱ्हे यांचे विधान परिषदेतील भाषण समाजमाध्यमावर खूप फिरत आहे. त्यावरून गोऱ्हे यांना ट्रोल केले जात आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, नीलम गोरे यांनी केलेलं भाषण हे पुन्हा सहाव्यांदा सभागृहात येण्यासाठी शिंदेंच्या स्तुतीपाठक म्हणून केलेलं भाषण होतं. हे ओळखण्याइतके शिंदे निश्चितच हुशार आहेत.

पण पाच वेळा ज्यांनी सभागृहात पाठवलं त्यांच्याशी बाई प्रामाणिक राहू शकत नसतील तर त्या शिंदेंशी प्रामाणिक काय राहतील ? हे शिंदेंपेक्षा अधिक चांगलं दुसरं कोण समजू शकेल ? असाही टोला अंधारे यांनी लगावला आहे.

दरम्यान, गोऱ्हे यांच्या भाषणावर अंधारे यांनी टीका केल्यामुळे दोन्ही बाजूनी दिवसभर प्रचंड ट्रोलिंग सुरु झाले आहे. खुर्चीसाठी बोललेच पाहिजे ना इथपासून ते नीलमताई विद्वान आहेत म्हणून उपसभापती आहेत असे दोन्ही बाजूनी युक्तीवाद सुरु आहेत.