मुंबई : दोनऐवजी एका सत्रात परीक्षा घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (नीट पीजी) परीक्षेची तारीख राष्ट्रीय वैद्यकीय शास्त्र परीक्षा मंडळाने (एनबीईएमएस) जाहीर केली आहे. त्यानुसार नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. यासाठी परीक्षा केंद्र पसंतीक्रम नोंदविण्यासाठी १३ ते १७ जूनपर्यंत मुदत देण्यात येणार आहे.

पर्सेंटाईलमुळे होणारा गाेंधळ लक्षात घेऊन वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी नीट पीजी परीक्षा देणाऱ्या दाेनऐवजी एका सत्रात घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एनबीईएमएसने नीट पीजी परीक्षा एकाच सत्रामध्ये घेण्याचा निर्णय घेऊन ही परीक्षा ३ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. परीक्षा एकाच सत्रामध्ये घेण्यासाठी एनबीईएमएसने परीक्षा केंद्र असलेल्या शहरांमध्ये वाढ केली आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र निवडण्यासाठी शहर निवडण्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १३ जून रोजी दुपारी ३ नंतर संकेतस्थळावर पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना १७ जून रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत शहरांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी निवडलेल्या शहरातील परीक्षा केंद्राची एनबीईएमएसद्वारे वाटप करण्यात येणार आहे.

परीक्षेसाठीच्या शहरांची निवड ही प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जामध्ये नाव, श्रेणी, राष्ट्रीयत्व, ई-मेल, मोबाइल क्रमांक आणि परीक्षेचे शहर वगळता अन्य माहिती व कागदपत्रे संपादित करण्यासाठी २० ते २२ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २१ जुलै रोजी परीक्षा शहराची माहिती कळविण्यात येणार आहे. त्यानंतर, ३१ जुलै रोजी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राची माहिती देण्यात येणार आहे. तसेच परीक्षेचा निकाल ३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे परीक्षा एनबीईएमएसद्वारे कळवण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राला दिलेल्या पसंतीनुसार त्यांना परीक्षा केंद्र देण्यासाठी एनबीईएमएसकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मात्र प्रशासकीय किंवा अन्य कारणांमुळे संबंधित राज्यात जागा उपलब्ध नसल्यास भारतात परीक्षा केंद्र कुठेही दिली जाऊ शकते. तसेच परीक्षा केंद्र उपलब्ध नसलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना अन्य राज्यातील परीक्षा केंद्राचा पर्याय निवडावा लागणार असल्याचे एनबीईएमएसकडून जाहीर करण्यात आले आहे.