मुंबई : ३ मे रोजी होणाऱ्या नीट यूजी २०२६ परीक्षेत यंदा कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या २ व ३ मे रोजी असलेल्या सुट्या रद्द करण्याबाबत सर्व वैद्यकीय महाविद्यालयाना निर्देश देण्याची सूचना शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला (एनएमसी) केली आहे.

नीट यूजी ही देशातील एमबीबीएस, बीडीएस आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी सर्वात महत्त्वाची राष्ट्रीय परीक्षा आहे. दरवर्षी या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसत असल्याने तिची विश्वासार्हता आणि पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या काही वर्षांत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे यंदा शिक्षण मंत्रालयाने कठोर पावले उचलली आहेत. परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना सूचना देण्याबाबत शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून पत्र जारी करण्यात आले आहे. या पत्राची प्रत एनएमसीकडून देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना पाठविण्यात आली आहे. यामध्ये नीट यूजी परीक्षेच्या आयोजनादरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

२ आणि ३ मे रोजी रजा देऊ नये

परीक्षेपूर्वी आणि परीक्षेच्या दिवशी म्हणजे २ आणि ३ मे २०२६ रोजी विद्यार्थ्यांना रजा मंजूर करू नये, असा सल्ला सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना देण्यात आला आहे. केवळ अत्यावश्यक व अपवादात्मक परिस्थितीत योग्य कारण असल्यास रजा देण्याचा विचार करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ही उपाययोजना संभाव्य गैरवापर टाळण्यासाठी आणि परीक्षा निष्पक्ष पद्धतीने पार पाडावी यासाठी करण्यात आल्याचे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश

पूर्वी काही घटनांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा परीक्षा प्रक्रियेला बाधा आणण्याच्या प्रकारात सहभाग आढळल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांना परीक्षा प्रक्रियेला बाधा पोहोचवणाऱ्या कोणत्याही कृतीत सहभागी होऊ नये, याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात. तसेच गैरप्रकार, फसवणूक, पेपरफुटी, बनावट उमेदवार किंवा परीक्षा व्यवस्थेत हस्तक्षेप यासारख्या बाबींविरोधात विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यावर भर देण्यात आला आहे. परीक्षा प्रक्रियेवर कुठलेही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी प्रशासनाशी समन्वय साधून तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.