मुंबई : वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले असून ‘नीट-यूजी २०२६’अंतर्गत अखिल भारतीय कोटा, अभिमत विद्यापीठे आणि केंद्रीय विद्यापीठांमधील एमबीबीएस, बीडीएस, तसेच बीएस्सी नर्सिंगच्या प्रवेशासाठी दुसरी फेरी ३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच राज्य कोट्यातील दुसऱ्या फेरीची प्रक्रिया ७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

अखिल भारतीय कोट्यातील दुसऱ्या फेरीसाठी ३ ते ८ सप्टेंबरदरम्यान नोंदणी व शुल्क भरण्याची प्रक्रिया होईल. ८ सप्टेंबरला दुपारी ३ पर्यंत नोंदणीची मुदत असून, शुल्क भरण्याची सुविधा त्याच दिवशी सायंकाळी ६ पर्यंत उपलब्ध आहे. त्यानंतर ३ ते ९ सप्टेंबरदरम्यान पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया करता येईल. पसंतीक्रम ‘निश्चित’ करण्यासाठी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ पासून ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अखिल भारतीय कोट्यातील जागावाटपाची प्रक्रिया ९ आणि १० सप्टेंबरला होऊन, प्रवेशाचा निकाल ११ सप्टेंबरला जाहीर केला जाणार आहे. जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना १२ ते १८ सप्टेंबरदरम्यान संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता येईल.

राज्य कोट्यातील दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया ७ ते ११ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. राज्य कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत १८ सप्टेंबर आहे. या प्रवेश फेरीबाबतचे तपशील प्रत्येक राज्याकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) स्पष्ट केले. अखिल भारतीय आणि राज्य कोट्यातील दुसऱ्या फेरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीची संबंधित यंत्रणांकडून १९ सप्टेंबरला पडताळणी केली जाणार आहे. प्रवेशाचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळता यावे आणि समुपदेशनासाठी उपलब्ध असलेला मर्यादित कालावधी लक्षात घेता, शनिवार, रविवार तसेच राजपत्रित सुट्ट्यांनाही कामकाजाचे दिवस मानण्याच्या सूचना सहभागी संस्था आणि महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

दुसऱ्या फेरीचे प्रवेश वेळापत्रक

प्रवेश प्रक्रिया – अखिल भारतीय कोटा

तात्पुरती जागा मॅट्रिक्स पडताळणी – १ व २ सप्टेंबर

नोंदणी व शुल्क भरणे – ३ ते ८ सप्टेंबर

पसंतीक्रम भरणे – ३ ते ९ सप्टेंबर

पसंतीक्रम ‘लॉक’ करणे – ८ ते ९ सप्टेंबर

जागावाटप प्रक्रिया – ९ ते १० सप्टेंबर

प्रवेश निकाल – ११ सप्टेंबर

महाविद्यालयात प्रवेश – १२ ते १८ सप्टेंबर

प्रवेशित विद्यार्थ्यांच्या माहितीची पडताळणी – १९ सप्टेंबर