मुंबई : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) या संकेतस्थळावर मागील महिनाभरापासून वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा ( नीट ) अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र मागील आठवडाभरापासून संकेतस्थळावर अर्ज भरताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

इयत्ता बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी प्रयत्न केले. परंतु तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरणे शक्य झाले नाही. परिणामी राज्यातील हजारो विद्यार्थी नीटचा अर्ज भरण्यापासून वंचित राहिले आहेत.

एमबीबीएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी नीट देणे आवश्यक असते. मागील काही वर्षात या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये वाढ होत आहे. यंदा नीट परीक्षा ३ मे रोजी होणार असून या परीक्षेसाठी ८ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान अर्ज नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र मागील आठवडाभरापासून राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठी दिलेल्या लिंकवर तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरणे शक्य होत नव्हते.

तसेच राज्य मंडळाकडून घेण्यात आलेली इयत्ता बारावीची परीक्षा नुकतीच पार पडली. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्याना अर्ज भरण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यातच नीट परीक्षेचा अर्ज भरण्यास येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरणे शक्य झाले नाही. परिणामी राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, नाशिक, नागपूर, वर्धा यासारख्या विविध भागातील विद्यार्थी नीटचा भरण्यापासून वंचित राहिले आहेत. संकेतस्थळाला असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसाना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नीट अर्ज नोंदणी करण्यासाठी किमान आठवडाभराची मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्यातील विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थी संघटनांकडून राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडे करण्यात येत आहे.

नीट युजी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची वाढती स्पर्धा

गेल्या काही वर्षांत नीट परीक्षेसाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडे अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. २०२५ मध्ये नीट परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या उमेदवारांची संख्या २३ लाखांपेक्षा जास्त होती. त्यापैकी सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. २०२४ मध्येही सुमारे २३ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. २०२३ मध्ये २० लाख ३८ हजार, २०२२ मध्ये १७ लाख ६४ हजार, २०२१ मध्ये १५ लाख ४४ हजार आणि २०२० मध्ये सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.