मुंबई : गतवर्षी नीट यूजी प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६९६ विद्यार्थ्यांनी त्यांच्या बँकेचे तपशील चुकीचे भरले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी भरलेली सुरक्षा ठेव अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना परत पाठविणे वैद्यकीय समुपदेशन समितीला (एमसीसी) शक्य झालेले नाही. त्यामुळे वर्षभरापासून ही सुरक्षा ठेव एमसीसीकडेच आहे. सुरक्षा ठेव न मिळालेल्या या ६९६ विद्यार्थ्यांना तातडीने बँक खात्याचा अद्ययावत व सविस्तर तपशील प्रतिज्ञापत्रासह सादर करण्याचे आवाहन एमसीसीकडून करण्यात आले आहे.

नीट यूजी निकालानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या समुपदेशन फेरीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक असते. त्यात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयासाठी साधारणपणे ५० हजार तर अभिमत विद्यापीठासाठी ही रक्कम दोन लाख रुपये इतकी असते. वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये पुन्हा वळती केली जाते. मात्र एमसीसीने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत सूचनेनुसार अनेक विद्यार्थ्यांची बँक खाती बंद असणे, चुकीचे खाते क्रमांक, अवैध आयएफएससी कोड किंवा इतर बँकिंग त्रुटींमुळे सुरक्षा ठेव परताव्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे वित्तीय संस्थेने उपलब्ध बँक तपशीलांच्या आधारे अनेकदा परतावा रक्कम पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र तपशील चुकीचा असल्याने सुरक्षा ठेव रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकली नाही.

परिणामी काही महिन्यांपासून ६९६ विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत ही सुरक्षा ठेव रक्कम अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही. ही रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळावी, यासाठी एमसीसीने प्रलंबित परताव्यांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, संबंधित विद्यार्थ्यांची यादी एमसीसीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. परतावे अद्याप प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले नाव यादीत तपासून तातडीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन एमसीसीकडून करण्यात आले आहे.

सुरक्षा ठेव मिळविण्यासाठी कसा अर्ज करणार

सुरक्षा ठेव न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ‘परिशिष्ट अ’ या निर्धारित नमुन्यानुसार आवश्यक माहिती सादर करण्याच्या सूचना एमसीसीने विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. ही माहिती न्यायालयीन मुद्रांक असलेल्या पेपरवर (कोर्ट फी स्टॅम्प) तयार केलेल्या आणि नोटरीकृत केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात सादर करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे. पूर्ण भरलेले ‘परिशिष्ट अ’ आणि आवश्यक प्रतिज्ञापत्र एमसीसीच्या adgme@nic.in आणि financemcc@lifecarehll.com या अधिकृत ई-मेल आयडीवर पाठवावी लागणार आहे.

कागदपत्रे वेळेत सादर करण्याचे आवाहन

एमसीसीने सर्व संबंधित विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे शक्य तितक्या लवकर सादर करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षा ठेव परताव्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक माहिती आणि कागदपत्रे वेळेत न दिल्यास परतावा प्रक्रियेत आणखी विलंब होण्याची शक्यता असल्याचेही एमसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अपूर्ण माहिती, चुकीचे तपशील किंवा निर्धारित नमुन्यानुसार न सादर केलेली कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असेही एमसीसीने स्पष्ट केले आहे.