मुंबई : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेसंदर्भातील (नीट) कथित पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, परीक्षा प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

नीट परीक्षेतील १८० पैकी १४० प्रश्न फुटले. या परीक्षेसाठी मुलांनी भरपूर मेहनत घेतली होती. पेपर फुटण्यामध्ये सर्वस्वी एनटीएची चूक आहे. पेपर फुटणार नाही असा दावा एनटीएकडून केला जात होता. मात्र एनटीएला कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात अपयश आले. पेपर फुटल्याने मुलांनी केलेली सर्व मेहनत वाया गेली. परीक्षा पुन्हा घेण्याच्या निर्णयामुळे प्रवेश प्रक्रियाही लांबणीवर पडली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्षही पुढे ढकलले जाणार आहे. परिणामी, पहिले वर्ष पूर्ण करण्यात अडचणी येतील, अशी संतप्त प्रतिक्रिया हर्षदा देवधर या विद्यार्थिनीने व्यक्त केली.

पेपर फुटीमुळे पुन्हा परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा मोठा मानसिक ताण विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. आमच्या केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली होती. मात्र आता पुन्हा अभ्यास करावा लागणार, पुन्हा परीक्षा द्यावी लागणार. एनटीएचा गलथानपणा याला कारणीभूत आहे. २०२४ पासून सातत्याने पेपर फुटीचे प्रकरण घडत आहे. यावरून एनटीए परीक्षा घेण्यास सक्षम नसल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे परीक्षा घेण्याचे अधिकार एनटीएकडून काढून घेवेत, अशी मागणी डोंबिवलीमधील विद्यार्थी ओंकार शंभूस याने केली.

पेपरफुटीचा सर्वाधिक मानसिक आणि शैक्षणिक फटका विद्यार्थ्यांनाच बसणार आहे. विद्यार्थ्यांची यात काहीच चूक नाही. प्रशासनाने आधीच सर्व खबरदारी घ्यायला हवी होती. पेपर फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पर्यायी प्रश्नपत्रिका उपलब्ध करण्याची व्यवस्था असायला हवी होती. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करावी, असे मत एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले.

एनटीएविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीदरवर्षी पेपरफुटीच्या घटना घडत असतील, तर परीक्षा सुरळीत आणि पारदर्शकपणे घेण्यात यंत्रणा अपयशी ठरत आहे. परीक्षेबाबत प्रशासनाने चोख व्यवस्था असल्याचा दावा केला होता. मात्र तरीही पेपर फुटल्याने एनटीए आणि परीक्षा घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पेपर फुटीबाबत अनेक दिवसांपासून आम्ही आवाज उठवत आहोत.

सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर व्यवस्थेत कुठेतरी मोठा दोष आहे. जे अधिकारी परीक्षा योग्य प्रकारे घेऊ शकत नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी पालक संघटनेच्या अनुभा सहाय यांनी केली.

नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणामुळे परीक्षा रद्द होणे म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचा विश्वासघात आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपर माफिया, भ्रष्ट अधिकारी आणि निष्क्रिय सरकारविरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांच्या भावना, पालकांचे कष्ट आणि तरुणाईचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी व्यक्त केली.