मुंबई : नीट-युजी परीक्षेवरून झालेल्या आंदोलनांनंतर, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठात एका विद्यार्थिनीने धाव घेऊन तिच्या गुणपत्रिकेतील त्रुटी सुधारण्याची मागणी केली. न्यायालयानेही तिच्या याचिकेची दखल घेऊन राष्ट्रीय परीक्षा संस्थेला (एनटीए) नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. नीट परीक्षेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालाच्या मुख्य खंडपीठात दाखल झालेली ही पहिलीच याचिका आहे.याचिकाकर्तीच्या याचिकेनुसार, परीक्षेत तिला ४१० गुण मिळायला हवे होते. परंतु, प्रत्यक्षात तिला केवळ ३४० गुण मिळाले.
त्यामुळे, गुणपत्रिकेतील त्रुटी सुधारण्यासाठी १७ जुलैपासून एनटीएला पाच ई-मेल पाठवूनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रवेशासाठीच्या समुपदेशनाच्या फेऱ्या आधीच निश्चित झाल्या आहेत. न्यायमूर्ती रियाझ छागला आणि न्यायमूर्ती फरहान दुबाश यांच्या खंडपीठापुढे याचिकाकर्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालयाने याचिकेवर एनटीएला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले.याचिकाकर्तीने २०२३ मध्ये माध्यमिक शिक्षण आणि २०२५ मध्ये ७४ टक्के गुणांसह उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले असून तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे आहे. तिने २१ जून रोजी नीट-युजी परीक्षा दिली होती.
त्यानंतर १३ जुलै रोजी उत्तरपत्रिका पाहिल्यानंतर तिला तिचे गुण ४१० असतील, असा अंदाज आला होता. मात्र, २५ जुलै रोजी जाहीर झालेल्या निकालात तिला ३४० गुणच मिळाले. त्यामुळे, व्यथित होऊन तिने गुणदुरुस्तीच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रवेश प्रक्रिया सुरू असताना आणि वेळ वेगाने निघून जात असल्याने न्यायालयाने यावर लवकर निर्णय घ्यावा आणि परीक्षा घेणाऱ्या एनटीएला तिची उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. तिला दंतवैद्यकीयला (बीडीएस) प्रवेश हवा आहे, असेही याचिकाकर्तीने याचिकेत नमूद केले आहे.
