scorecardresearch

मुंबईची कूळकथा : सहाव्या शतकातील दुर्लक्षित मागाठाणे!

मागाठाणेची ही लेणी मुंबईकरांना फारशी माहीत नाहीत

मागाठाणे लेणींची सद्यस्थिती.

‘‘कल्याण येथील व्यापारीश्रेष्ठी असलेल्या आनंदचा मुलगा अपरेणू याने जवळच असलेल्या मगलठाणे येथील अध:पन खेत म्हणजेच अधेलीची जमीन कान्हशेलच्या बौद्धभिक्खू संघाला दान दिली आहे. त्यातून येणाऱ्या उत्पन्नाचा वापर भिक्खूसंघाच्या निर्वाहासाठी करण्यात यावा.’’

बोरिवली येथील कान्हेरीच्या लेणी क्रमांक २१ मधील या शिलालेखामध्ये ज्याचा उल्लेख येतो ते मगलठाणे म्हणजे मागाठाणेच होय. याच मागाठाणेला दुर्लक्षित असलेली बौद्धलेणीही पाहायला मिळतात. एरवी मागाठाणेची ही लेणी मुंबईकरांना फारशी माहीत नाहीत. कान्हेरी, महाकाली, जोगेश्वरी, घारापुरी आणि अगदीच डोक्यावरून पाणी म्हणजे मंडपेश्वरची लेणी ठाऊक असतात. पण मागाठाणेची लेणीही तेवढीच महत्त्वाची आहेत.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवली पूर्वेस मागाठाणेकडून स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या दत्तपाडा मार्गावर डाव्या बाजूस असलेल्या झोपडपट्टीमध्ये ही लेणी आहेत.

मग्गस्थानकपासून अपभ्रंश होत त्याचे मगलठाणे, मग्गठाणे आणि नंतर मागाठाणे असे झाल्याचे मानले जाते. मग्ग म्हणजे मार्ग आणि त्यावर थांबण्याचे ठिकाण म्हणजे मागाठाणे होय, असे भाषातज्ज्ञांना वाटते.

मागाठाणेची जुनी माहिती आपल्याला मिळते ती एम. जी. दीक्षित यांच्या पीएच.डी.च्या शोधप्रबंधामध्ये. हा शोधप्रबंध ५० च्या दशकातील आहे. त्यात म्हटले आहे, मागाठाणे हे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे आणि पशुपालकांचे गाव आहे. या लेणी पोईसर लेणी या नावानेही ओळखल्या जातात. पोईसर हे मागाठाणेच्या वेशीला लागून असलेले गाव आहे. आणि ते या लेणींपासून सर्वाधिक जवळ आहे. या लेणींचा उल्लेख बॉम्बे गॅझेटिअरमध्येही सापडतो. बॉम्बे गॅझेटिअरमधील उल्लेखानुसार आजूबाजूला दाट हिरवी झाडी असल्याने त्या बाहेरून दृष्टीस पडत नाहीत, असा आहे. आजही लेणी बाहेरून नजरेस पडत नाहीतच कारण तिथे उभी राहिलेली झोपडपट्टी. यातील काही झोपडय़ांखाली येथील काही लेणी खाली दबली गेली आहेत.

दीक्षित त्यांच्या प्रबंधामध्ये म्हणतात, इथे मध्यभागी सुमारे पंचवीस बाय सहा फुटांचा मोठय़ा सभागृहाचा भाग असावा.   लेणींच्या पूर्वेकडील बाजूस व्हरांडा असून तिथे असलेल्या स्तंभांवर डबल क्रिसेंट पद्धतीचे अलंकरण आहे. अशा प्रकारचे अलंकरण कोकणातील कुडा आणि कान्हेरी या अगदी सुरुवातीच्या काळातील लेणींमध्ये पाहायला मिळते. डावीकडच्या बाजूस या लेणींचे मुख्य प्रवेशद्वार असून तिथे दोन मोठय़ा पाण्याच्या टाक्या होत्या. त्यावर दगडी झाकणेही होती. आतमध्ये असलेल्या चत्यामध्ये सहा ते सात स्तंभांवर शंखाकृती रचना असून त्यावर फारसे अलंकरण नाही. सहाव्या शतकातील लेणींचा हा विशेष इथे पाहायला मिळतो. इथे एक सर्वात महत्त्वाचे चत्यही आहे. किंबहुना ते या लेणींमधील सर्वात महत्त्वाचे लेणे आहे, असे म्हणता येईल. हे आकारानेही सर्वात मोठे असून लेणींच्या वायव्येस आहे, असा उल्लेख गॅझेटिअरमध्ये सापडतो.’ दीक्षितांनी ही नोंद केली त्या वेळेस या चत्यामध्ये बाहेरच्या बाजूने आतमध्ये मोठय़ा पाण्याची गळती सुरू होती. आजही ती गळती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. दीक्षित त्यांच्या नोंदीमध्ये म्हणतात, हे चत्य म्हणजे एक मोठे चौकोनी आकाराचे सभागृह असून त्याच्या दोन्ही बाजूला बसण्यासाठी बेंचसारखे दगडी बांधकाम करण्यात आले आहे. समोरील िभतीच्या एका बाजूला गौतम बुद्धाची मोठी शिल्पकृती पाहायला मिळते. पद्मासनात बसलेला बुद्ध इथे दिसतो. शिल्पाकृतीचा मधला काही भाग कालौघात पडला आहे. तर या मोठय़ा बुद्ध शिल्पाकृतीच्या दोन्ही बाजूस हातात मोठे कमळपुष्प घेतलेल्या अवलोकितेश्वराची शिल्पाकृती होती. ती आता धूसर दिसते. तर या बुद्धमूर्तीच्या दुसऱ्या बाजूस धर्मचक्र मुद्रेमधील ध्यानी बुद्धाच्या विविध पाच छोटेखानी शिल्पाकृती दिसतात.

इथे असलेली तोरणाची कलाकृती मात्र अप्रतिम असून त्यावर उत्तम कोरीव काम करण्यात आल्याचे दीक्षितांनी म्हटले आहे. ते म्हणतात, यावर हत्ती, मकर, उडणाऱ्या अप्सरा अतिशय उत्तम पद्धतीने कोरलेल्या आहेत. वेरुळमधील विश्वकर्मा लेणींशी समांतर जाणारी अशी ही कलाकृती आहे.’’ दीक्षितांप्रमाणेच अजिंठा लेणींवर सर्वाधिक संशोधन करणारे ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. वॉल्टर स्पिंक यांनीही मागाठाणेच्या लेणींमधील अलंकरणाचा संबंध अजिंठाशी जोडला आहे. अजिंठाला समकालीन फारसे काही आपल्याकडे सापडत नाही, त्या पाश्र्वभूमीवर डॉ. स्पिंक यांनी केलेली ही नोंद महत्त्वाची ठरते.

मागाठाणेच्या आजूबाजूच्या परिसरात सापडणारे पुरतत्त्वीय अवशेषही लेणींचा परिसर सहाव्या शतकाच्या सुमारासचा असावा, असाच संकेत देतात, त्यामुळे सहाव्या शतकात या परिसरात बौद्ध धर्माचे प्राबल्य होते, हेच या मागाठाण्याच्या लेणी सिद्ध करतात, मात्र असे असले तरी केंद्र आणि राज्यात अस्तित्वात असलेल्या सरकारच्या लेखी याचे महत्त्व शून्यच आहे. तसे त्यांनी न्यायालयात मान्यही केले आहे. त्यामुळे लेणींच्या दुरवस्थेचा प्रवास सुरूच आहे.     (पूर्वार्ध)

vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab

 

 

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Neglected buddhist magathane caves of the sixth century

ताज्या बातम्या