मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगणदरम्यान उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे काम हाती घेतले असून प्रवाशांना लवकरच जलद गतीने प्रवास करता येणार आहे. त्यासाठी पालिकेने कामाला वेग दिला आहे. प्रकल्पातील सर्व कामे जलदगतीने निर्धारित वेळेत पूर्ण करावी. तसेच उड्डाणपुलाचे काम ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करावे, असे स्पष्ट आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतेच यंत्रणांना दिले.

वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगणदरम्यान महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या उड्डाणपूल व भुयारी मार्ग प्रकल्पाची अभिजीत बांगर यांनी बुधवारी पाहणी केली. त्यावेळी त्यांना अधिकाऱ्यांकडून विविध कामांची सद्यस्थिती, प्रगती तसेच पुढील कार्यवाहीचा आढावा घेतला. नेहरू विज्ञान केंद्राच्या बाजूला १२०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य पाइलचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. त्यापैकी १८ पैकी १७ पाइल कॅप, १८ पैकी १७ पिअर आणि १८ पैकी १७ पिअर कॅपचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, जिजामाता नगरच्या बाजूला १२०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. एकूण १७ पैकी १७ पाइल कॅप, १७ पैकी १७ पिअर आणि १७ पैकी १७ पिअर कॅपचे काम पूर्ण झाले आहे. पोर्टल बीम व गर्डर निर्मितीचे काम प्रकल्पस्थळी तसेच निर्मिती केंद्रात सुरू आहे. एकूण १४ पैकी १४ पोर्टल बीमचे काम पूर्ण झाले असून, १८ गर्डर स्पॅनपैकी १७ गर्डर स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १ गर्डर स्पॅनचे काम प्रगतिपथावर आहे. पोर्टल बीम व गर्डर स्पॅन उभारणीचे कामदेखील वेगाने सुरू आहे. एकूण १४ पैकी १३ पोर्टल बीमची उभारणी पूर्ण झाली असून, १८ पैकी ९ गर्डर स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे. तसेच, डेक स्लॅब काँक्रिटीकरणाचे काम एकूण १८ स्पॅनपैकी ७ स्पॅनमध्ये पूर्ण झाले असून, आणखी २ स्पॅनचे काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.

वाहतूक कोंडी कमी, प्रवासाचा वेळही वाचणार

नेहरू विज्ञान केंद्र उड्डाणपुलामुळे नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. सध्या या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांना वरळी नाका (आचार्य अत्रे चौक) येथून वळसा घालून जावे लागते. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ सुमारे १५ मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.

या पुलामुळे ई. मोझेस मार्गावरून थेट ॲनी बेझंट मार्ग तसेच धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गाकडे जाण्यासाठी अधिक सोपा आणि जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. लोअर परळ, महालक्ष्मी आणि करी रोडकडून येणाऱ्या वाहनांनाही या पुलाचा थेट वापर करता येणार आहे.

परिणामी, वरळी नाका परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, प्रवासाचे अंतर व वाहतूक कोंडी कमी झाल्यामुळे इंधनाचीही बचत होणार आहे.

प्रकल्पातील उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री व संसाधनांचे योग्य नियोजन करावे. कामकाजाचा वेग वाढवावा.

प्रकल्पाचे काम विविध विभागांमध्ये आवश्यक समन्वय साधून पुढे न्यावे. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून वाहतूक आराखडा तयार करावा, असे आदेश अभिजीत बांगर यांनी दिले.