मुंबई : शालेय विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना ग्रह-तारे, अवकाश विश्वाची गोडी लावणाऱ्या मुंबईतील वरळी येथील ‘नेहरू तारांगणा’ ने मंगळवारी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले. मागील पाच दशकांपासून शिक्षक, संशोधक, नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये दृकश्राव्य माध्यमातून विज्ञान व खगोलशास्त्राची आवड निर्माण करण्यासोबतच वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यात नेहरू तारांगणाने महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

‘नेहरू तारांगण’ ची स्थापना ३ मार्च १९७७ रोजी करण्यात आली. भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे नाव या वास्तूला देण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विविध उपक्रम, विज्ञान प्रश्नमंजुषा आणि वक्तृत्व स्पर्धा आणि प्रयोग यामुळे नेहरू तारांगण मुंबईकरांसोबतच पर्यटकांसाठीही आकर्षणाचा बिंदू ठरत असते. सुरुवातीच्या ऑप्टोमेकॅनिकल प्रणालीपासून ते अत्याधुनिक डिजिटल डोम प्रणालीपर्यंत प्रवास करणारे नेहरू तारांगण खगोलशास्त्र विषयाचे ज्ञानकेंद्र म्हणून गेली पाच दशके कार्य करत आहे. अनेक मुंबईकरांच्या बालपणीच्या आठवणी नेहरू तारांगणाशी जोडलेल्या आहेत.

देशातील पहिले डिजिटल तारांगण २००३ मध्ये नेहरू तारांगण येथे सुरु करण्यात आले. त्यात ‘डिजिस्टार-३ ही प्रणाली बसविण्यात आली. या अत्याधुनिक प्रोजेक्टरमुळे प्रेक्षकांना खगोलशास्त्र विषयक विदा (डेटा) यांचा अनुभव प्रभावीपणे घेता येत आहे. कोरोना काळानंतर नेहरू तारांगण येथे जगातील सर्वोत्तम प्रोजेक्टर बसविण्यात आले आहेत. आतापर्यंत तारांगणाकडून खगोलशास्त्रविषयक विविध ४० कार्य्रक्रमांची निर्मिती करण्यात आली असून याचा अनुभव लाखो नागरिकांनी घेतला आहे, अशी माहिती नेहरू तारांगणाचे संचालक डॉ. अरविंद परांजपे यांनी दिली.

नेहरू तारांगणात मूकबधिर विद्यार्थ्यांसाठीही विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अशा कार्य्रक्रमाचे आयोजन करणारी नेहरू तारांगण ही देशातील पहिलीच संस्था आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेला ‘विज्ञान प्रयोगशाळा’ हा येथील लोकप्रिय उपक्रम आहे. त्यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी दिली जाते, असेही परांजपे यांनी सांगितले. दर रविवारी आकाशदर्शनाचा कार्यक्रम, विशेष खगोलीय घटना, जसे धूमकेतू, ग्रहण इत्यादींच्या निरीक्षणांसाठी दुर्बिणींची व्यवस्था करणे तसेच विविध क्षेत्रातील शास्त्रज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन येथे केले जाते.

सध्या नेहरू तारांगणात दररोज तीन भाषांमध्ये चार कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांच्या वेळाही वेगळ्या असल्याने अनेकदा त्या-त्या भाषेचे प्रेक्षक वगळता इतर भाषिकांना कार्यक्रमांत सहाभागी होता येत नाही. विविध भाषिक प्रेक्षकांच्या सोयीसाठी एकाच वेळी विविध भाषांमध्ये कार्यक्रम ऐकता येईल अशी सुविधा निर्माण करण्याचा मानस आहे, असेही परांजपे यांनी सांगितले.

‘नेहरू तारांगण’ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. नेहरू सेंटरकडून कायमच नेहरू तारांगणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाते. आम्ही नेहमीच समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. सुवर्ण महोत्सवी वर्षातही विविध उपक्रम राबविले जातील. – डॉ. अरविंद परांजपे – संचालक, नेहरु तारांगण