मुंबई : वरळी येथील प्रसिद्ध नेहरू तारांगण येथे नुकताच ‘चांद्र मोहीम – भारताचा चंद्राकडे प्रवास’ या नव्या ‘फुलडोम प्लॅनेटेरियम’ कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमातून भारताच्या चंद्र मोहिमेच्या प्रवासासह चंद्रावरील अनेक गोष्टी दृक्-श्राव्य माध्यमातून उलगडणार आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिनही भाषांमध्ये पाहता येणार आहे.

नेहरू तारांगणने नुकतेच सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले. विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना ग्रह-तारे, अवकाश विश्वाची गोडी लावणाऱ्या नेहरू तारांगणाकडून नेहेमीच नवे उपक्रम राबविले जातात. त्यातच आता ‘चांद्र मोहीम – भारताचा चंद्राकडे प्रवास’ या कार्यक्रमाची भर पडली आहे.

या कार्यक्रमाची पटकथा इस्रोच्या क्षमता बांधणी कार्यक्रम कार्यालयाचे माजी संचालक डॉ. सुधीर कुमार यांनी लिहिली असून पुणे येथील वेदार्थ ॲनिमेशन स्टुडिओकडून याची निर्मिती करण्यात आली आहे. विज्ञान, इतिहास आणि चंद्राविषयीच्या रंजक गोष्टी पटकथेच्या माध्यमातून हळूहळू प्रेक्षकांसमोर उलगडत जातात. यात प्राचीन कल्पनांपासून ते आधुनिक संशोधनापर्यंत, तसेच भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या नेतृत्वाखालील भारताचा प्रेरणादायी चंद्र मोहिमेचा प्रवास यात दाखविण्यात आला आहे.

२००८ मधील ‘चांद्रयान १’चे ऐतिहासिक प्रक्षेपण पुन्हा अनुभवता येते. तसेच ‘चांद्रयान २’ आणि ‘चांद्रयान ३’चा अद्भुत प्रवासही या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कहाणी नसून उत्सूकता आणि नवीन शोधाच्या मानवी भावनेचा उत्सव आहे. धाडसी स्वप्न आणि चिकाटीने केलेले प्रयत्न ज्ञानाच्या सीमा ओलांडू शकतात. तसेच हा कार्यक्रम पुढच्या पिढीला अवकाश क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे, असे नेहरू तारांगणाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीपत्रात म्हटले आहे. नेहरू तारांगणकडून आतापर्यंत खगोलशास्त्रविषयक ४० कार्यक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे.

‘चांद्र मोहीम – भारताचा चंद्राकडे प्रवास’ कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

या कार्यक्रमात फुलडोम व्हिज्युअल्स, वास्तववादी चंद्राचे लँडस्केप्स आणि नाट्यमय अंतराळ उड्डाण तसेच चंद्राच्या खडकाळ पृष्ठभागावर जाण्याचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. याचबरोबर प्रज्ञान रोव्हरच्या मोहिमेतून शास्त्रज्ञ चंद्राच्या मातीचे विश्लेषण कसे करतात, भूकंपीय क्रियाकलापांचा अभ्यास, तापमान कसे मोजतात याचीही माहिती मिळणार आहे. तसेच चंद्राचा इतिहास आणि भविष्यातील संशोधन या विषयीही प्रेक्षकांच्या ज्ञानात भर पडणार आहे.